मध्य आणि हार्बर मार्गावर काही महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामांमुळे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र या रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसेल. या मेगाब्लॉकमुळे काही गाडय़ा रद्द करण्यात येणार असून वाहतूक वेळापत्रकापेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू राहील.

* कुठे – मुलुंड व माटुंगा या दरम्यान अप धीम्या मार्गावर
* कधी – सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५
* परिणाम – ब्लॉकदरम्यान अप धीम्या मार्गावरील सर्व गाडय़ा ठाण्यापासून पुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकांवर थांबतील. या गाडय़ा नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत. तर डाउन जलद मार्गावरील गाडय़ा त्यांच्या इतर थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील.
* कुठे – कुर्ला आणि वाशी यांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर
* कधी – सकाळी ११.०० ते दुपारी ३.००
* परिणाम- ब्लॉकदरम्यान सीएसटी-पनवेल मार्गावरील वाहतूक पूर्णवेळ बंद राहील. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी-कुर्ला आणि पनवेल-मानखुर्द या मार्गावर विशेष गाडय़ा चालवल्या जातील.