मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत, हार्बर रेल्वेमार्गावर पनवेल-वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुलुंडहून कल्याणच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन स्लो/ सेमी फास्ट मार्गावरील लोकल सकाळी १०.४७ वाजल्यापासून दुपारी ३.५० वाजेपर्यंत डाऊन फास्ट मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. या मार्गावरील लोकलसेवा १० मिनिटे उशिराने धावतील. डाऊन स्लो मार्गावरील लोकल फास्ट मार्गावरुन वळवल्याने ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवरच थांबतील.

हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन रेल्वेमार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अप मार्गावरील पनवेल/बेलापूर स्थानकांवरुन सीएसएमटीसाठी निघणाऱ्या लोकल सकाळी ११.०६ ते दुपारी ४.३४ पर्यंत तसेच डाऊन मार्गावरील सीएसएमटीवरुन पनवेल आणि बेलापूरसाठी निघणाऱ्या लोकल सकाळी ११.१४ ते दुपारी ४ पर्यंत बंद राहतील. पनवेल-ठाणे अप ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा सकाळी १०.१२ पासून दुपारी ४.२६ पर्यंत तर ठाणे-पनवेल डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ११.१४ पासून दुपारी ४ पर्यंत बंद राहणार आहेत.

कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्लीमधील प्रवाशांना डोंबिवली, दिवा आणि ठाण्यापर्यंत अप स्लो मार्गावरुन प्रवास कऱण्याची मुभा देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर दि.२८ एप्रिल रोजी मध्यरात्री वसई रोड ते विरार दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आल्याने आज दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसेल.