मुंबईतील उपनगरीय रेल्वेप्रवाशांसाठी कायमच त्रासदायक ठरलेला मेगा ब्लॉक आता अत्याधुनिक अशा मेट्रो रेल्वेवरही सुरू झाला आहे. वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेवरील पहिला मेगा ब्लॉक २४ ते २६ जानेवारी असे तीन दिवस घेण्यात येणार आहे. या तीन दिवसांत मेट्रोच्या फेऱ्या पहाटे साडेपाचऐवजी सकाळी साडेसात वाजता सुरू होतील. सध्या पहाटे साडेपाच ते मध्यरात्री १२ या कालावधीत वसरेवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो रेल्वेच्या फेऱ्या चालतात. मेट्रो रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रथमच तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. २४, २५ आणि २६ जानेवारी २०१५ असे तीन दिवस देखभाल-दुरुस्तीचे तांत्रिक काम चालणार आहे. त्यासाठी रोज सकाळी दोन तास मेट्रोच्या फेऱ्या बंद ठेवण्यात येत आहेत. या तीन दिवसांत मेट्रो रेल्वेच्या फेऱ्या पहाटे साडेपाचऐवजी साडेसात वाजता सुरू होतील, असे ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’च्या प्रवक्त्याने कळवले आहे.