मध्य आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामानिमित्त रविवारी, १० मार्च रोजी चार ते पाच तासांचा मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर तीन रात्रींचा ब्लॉक घेण्यात आल्यामुळे दिवसा ब्लॉक घेण्यात येणार नसून त्याच काळात वसई रोड ते भाइंदर याच मार्गावर ब्लॉक घेण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी कळविले आहे.
मध्य रेल्वेवर सकाळी १०.१५ ते दुपारी ३.१५ या काळात माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक करण्यात आला आहे. त्यामुळे जलद मार्गावरील सर्व वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. सीएसटीकडे येणाऱ्या जलद मार्गावरील गाडय़ांना या काळामध्ये त्यांच्या नियमित थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे विशेष थांबा देण्यात आला आहे.
हार्बर मार्गावर मानखुर्द आणि नेरूल दरम्यान सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत दोन्ही दिशेने ब्लॉक करण्यात आला आहे. यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मानखुर्द आणि पनवेल ते ठाणे दरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य रेल्वे तसेच ट्रान्सहार्बर मार्गाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.