16 October 2019

News Flash

मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द

मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे

संग्रहित छायाचित्र

पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने ट्विटरच्या माध्यमातून १४ एप्रिलला नियोजित मेगाब्लॉक रद्द करत असल्याची माहिती दिली. तसंच मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी घेण्यात येणारे सर्व मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. हार्बर लाइन, मेन लाइन आणि इतर ब्लॉक घेतले जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलं.

रेल्वेकडून कारण सांगण्यात आलं नसलं तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रवाशांना प्रवासात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मेगाब्लॉक रद्द कऱण्यात आल्याची माहिती आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

याआधी मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर सकाळी ११.२० ते ३.५० पर्यंत मेगाब्लॉक जाहीर केला होता. तसंच हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार होता. तसंच मध्य रेल्वेने बदलापूर-कर्जत मार्गावर स. १०.३० ते दु. ३ या वेळेत विशेष ब्लॉक जाहीर केला होता.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते ३.३५ दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार होता. याशिवाय प्रभादेवी स्थानकावर पाच तासांचा ब्लॉक नियोजित होता. मात्र हे सर्व ब्लॉक रद्द करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे.

First Published on April 14, 2019 8:14 am

Web Title: megablock on cental harbour and western line cancelled