भाजपचे नुकसान झाल्याची प्रदेशाध्यक्ष पाटील यांची कबुली

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अन्य पक्षांतील बडय़ा नेत्यांना गळाला लावून संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न भाजपने केला असला तरी या ‘भरतीमुळेच भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का लागला’, असे सांगत भरतीच्या प्रयोगामुळे पक्षाचे नुकसानच झाल्याची अप्रत्यक्ष कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.

अशा प्रकारची कबुली देऊन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अन्य पक्षांतील नेत्यांच्या भरतीबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह लावले आहे.

भाजपला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. तेव्हापासूनच पक्षात चलबिचल सुरू झाली होती. अन्य पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिल्याने नुकसान झाल्याची कबुली देत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणल्याचे मानले जाते.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली इतर पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात स्थापन झाले. त्यानंतर विधान परिषदेची आमदारकी आणि इतर पदे देताना निष्ठावंतांना बाजूला ठेवून बाहेरून आलेल्यांना जास्त संधी मिळाल्याने पक्षात अस्वस्थता पसरली होती. त्यानंतर २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मेगाभरती सुरू झाली आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत मोठय़ा प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये आले. त्यात राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय, रणजितसिंह मोहिते-पाटील, गणेश नाईक-संदीप नाईक, हर्षवर्धन पाटील, मधुकर आणि वैभव पिचड, पद्मसिंह पाटील-राणा जगजितसिंह आदी अनेकांचा समावेश होता.

अन्य पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिल्यामुळे पक्षात अस्वस्थता पसरली होती, पण त्याबाबत कोणीही मतप्रदर्शन केले नव्हते. सत्ता असल्याने त्यावेळी तो असंतोष बाहेर पडला नाही. सत्ता गेल्यावर मात्र भाजपच्या जागा कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या वेगवेगळ्या चुकांबाबत विचारमंथन सुरू झाले आहे. अन्य पक्षांमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांमुळे फटका बसल्याचा निष्कर्ष पाटील यांनी काढला आहे.

पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांनी तुमच्या जवळ असलेल्यांना नव्हे तर भाजपच्या जवळ असलेल्यांना पद आणि जबाबदाऱ्या देण्याचा सल्ला दिला होता, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे कोणा विशिष्ट नेत्याच्या जवळ असलेल्यांना नव्हे तर पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांना भाजपमध्ये संधी मिळेल, असे संकेतच पाटील यांनी दिले.

भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का!

उमेदवारी मागावी लागू नये, ही भाजपची संस्कृती आहे. मेगाभरतीमध्ये ही संस्कृती कुठेतरी ढासळली. ती संस्कृती नव्याने विकसित करण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या धारणा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे, की हा पक्ष प्रेमावर चालतो, आपुलकीवर चालतो, गुणवत्तेवर चालतो. पक्षाचे अखिल भारतीय संघटनमंत्री व्ही. सतिश एका बैठकीत खूप चांगले वाक्य बोलले. ते म्हणाले की जे आपल्या जवळ आहेत, त्यांना नाही तर पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्याची आवश्यकता आहे. हे वाक्य माझ्या मनावर इतके कोरले गेले आहे की आपल्या पक्षात ‘दिल के नजदिक’ असणाऱ्यांना काम देण्याची जास्त पद्धत सुरू झाली आहे, असे वाटते. हा माझा, हा तुझा, तुझे काम करून देतो, तू तिकडे जातो का, मग त्यांच्याकडून तिकीट घे, तुला कसे तिकीट मिळत नाही पाहतो, अशा प्रकारचे जे काम पक्षात चालते, त्याला एका अर्थाने सुरूंग लावण्याची गरज आहे. चारही बाजूंनी जसे ढासळतेय तशा चारही बाजूंनी संधीही आहेत. या संधीचा नीट उपयोग करा!

– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप

..तरीही पक्षनिष्ठांना डावलले

अन्य पक्षांमधील नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने नुकसान झाल्याची कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी दिली. परंतु अध्यक्षपदी नियुक्ती केलेले महेश लांडगे हे अन्य पक्षातूनच भाजपमध्ये आले आहेत. पक्षाच्या ठाणे अध्यक्षपदी राष्ट्रवादीतून आलेल्या आमदार निरंजन डावखरे यांची शुक्रवारीच निवड करण्यात आली.