News Flash

बाजारगप्पा : मेहेर बाजार ते भायखळा भाजी मंडई

मुंबईतील इतर मंडईप्रमाणेच या मंडईचे बांधकाम ब्रिटिश पद्धतीने करण्यात आले आहे.

मुंबईतील सर्वात पहिला भाजी बाजार म्हणून भायखळ्याच्या ‘मेहेर मंडई’चे नाव घेतले जाते.

मुंबईतील सर्वात पहिला भाजी बाजार म्हणून भायखळ्याच्या ‘मेहेर मंडई’चे नाव घेतले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या या भाजी मंडईने १५७ वर्षे पूर्ण केली आहेत. ही मंडई अनेक सामाजिक, सांस्कृतिक अनुभवांनी जोडली गेली आहे. १९९६ मध्ये मंडईची सूत्रे नवी मुंबईतील भाजी मंडईत हलविण्यात आली; पण आजही या मंडईतील गजबज कायम आहे. आजही मुंबईतील उपाहारगृहे, रुग्णालये, मंदिरे यांना या मंडईतून भाजीपुरवठा होतो.

१८ व्या शतकात जुन्नरचे धोंडिबा कृष्णाजी मेहेर यांनी भायखळ्याच्या परिसरात भाजीपाल्याची लागवड सुरू केली. तेथेच या भाज्यांची विक्री केली जात होती. हे कळताच मुंबईतील अनेक जण भायखळ्यात भाजी खरेदीसाठी येऊ लागले. मात्र काही काळाने खरेदीच्या तुलनेत भाजी अपुरी पडत असल्याचे लक्षात आल्यावर मेहेर यांच्या मुलाने भायखळा ते महालक्ष्मी स्थानकापर्यंत जमिनीवर भाज्यांची लागवड सुरू केली. यानंतर जुन्नर येथील काही शेतकरी या व्यवसायात रुजू झाले. त्या काळी दादर, परळ, घाटकोपर, माहिम, वरळी, कुर्ला या ठिकाणी भाजी पिकवली जात होती. त्यानंतर मात्र ही मंडई विस्तारत गेली आणि इतर जिल्ह्य़ांतूनही भाज्यांची विक्री सुरू झाली. ब्रिटिशांनी राणीबागेच्या समोरील सुमारे तीन ते चार एकर जागा मेहेर यांना मंडई सुरू करण्यासाठी दिली. त्या वेळी मेहेर कुटुंबीयांची ही खासगी मालमत्ता असल्याने हे मार्केट मेहेर मंडई म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यानंतर ही मंडई सहकारी तत्त्वावर सुरू झाल्यानंतर याचे नाव भायखळा मार्केट म्हणून प्रसिद्ध झाले. सध्या या बाजाराची धुरा किरण झोडगे सांभाळत आहेत.

मुंबईतील इतर मंडईप्रमाणेच या मंडईचे बांधकाम ब्रिटिश पद्धतीने करण्यात आले आहे. मंडईचे बांधकाम उंचावर असल्याने येथे कधीच हवेची कमतरता जाणवत नाही. ही मंडई अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. १८८२ साली लोकमान्य टिळक आणि आगरकर यांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर याच मंडईत त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. १९०७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विवाह करण्यासाठी सभागृह उपलब्ध होत नसल्याने भायखळ्याच्या याच भाजी मंडईत त्यांचा विवाह सोहळा पार पडला. १९५१ ते १९५४ या काळात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘शिवचरित्र’ प्रकाशित करण्यासाठी पैसे कमी पडत होते. त्या वेळी पुण्याच्या हडपसर भाजीबाजारातून कोथिंबीर आणून भायखळ्याच्या मंडईत त्यांनी विक्रीचा व्यवसाय केला. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होत असत. त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य मंडईतील व्यापारी करीत असत. स्वातंत्र्यसैनिकांचे निरोप फळ-भाज्यांच्या करंडय़ांतून लपवून दिले जात होते. याशिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी हे मार्केट जोडले गेले असून या मंडईतील कामगार भाऊसाहेब कोंडिबा भास्कर हे संयुक्त महाराष्ट्र लढय़ात हुतात्मा झाल्याची नोंद आहे.

१९८५ साली मुंबई महानगरपालिकेने हे मार्केट विकत घेण्याचा ठराव केला. मात्र त्या वेळी काही नेत्यांनी एकत्र येत हे मार्केट ६० लाख रुपयांना सहकारी तत्त्वावर खरेदी केले. सध्या मंडईत ३३३ भाजी विक्रेते आहेत. हा बाजार भायखळा स्थानकापासून अगदी नजीक असल्यामुळे येथे कायम गर्दी असते. त्याशिवाय हे मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे व्यापाऱ्यांसाठी ही मंडई सोयीची आहे. वर्षांचे ३६५ दिवस ही मंडई खुली असते. साधारण सकाळी ३ ते ४ च्या सुमारास सातारा, सांगली, पुणे, बंगलोर या भागांतून रात्रभराचा प्रवास करून आलेले भाज्यांचे मोठमोठे ट्रक भायखळ्याच्या मंडईत दाखल होतात. दिवसाला साधारण १५० भाज्यांचे ट्रक या मंडईत येतात. ब्रोकोली, झुकीनी, लाल व पिवळी शिमला मिरची, बेबी कॉर्न, मशरूम अशा पाश्चिमात्य भाज्याही मंडईत ठेवल्या जातात.

या भाजी बाजारातील दर शेअर बाजाराप्रमाणे चढत उतरत असतात. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी कृत्रिम साठेबाजी अशा वेगवेगळय़ा कारणांनी भाज्यांचे दर वाढत असतात. भाजी हा नाशवंत घटक असल्याने बऱ्याचदा जास्त आवक झाली की एखाद्या भाजीचे दर अचानक प्रचंड कोसळतात. जूनमधील शेतकरी संपानंतर सर्वच बाजारांवर परिणाम झाला तसाच भायखळ्याच्या भाजी मंडईलाही याचे चटके सोसावे लागले. चढउताराचे अनेक प्रसंग या मंडईने अनुभवलेले आहेत. या प्रसंगांना येथील विक्रेता वर्ग सरावला आहेच, पण येथे नियमितपणे येणाऱ्या ग्राहकांनाही बाजाराची नाळ उमजली आहे.

मीनल गांगुर्डे

@MeenalGangurde8

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 4:26 am

Web Title: meher market to byculla vegetable mandai
Next Stories
1 पित्याच्या प्रसंगावधानामुळे बाळाला जीवदान
2 घाटकोपर स्थानकावर बालिकेचा जन्म
3 ‘त्या’ चरस तस्कराची एटीएसमार्फत चौकशी
Just Now!
X