पीएनबी गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेल्या मेहुल चोक्सीने अजामीनपात्र वॉरंटविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मेहुल चोक्सीने आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. पीएनबी गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय न्यायालय आणि त्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालयाने मेहुल चोक्सी व अन्य पाच जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनीही पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींना चुना लावल्याचा आरोप आहे. या दोघांविरोधातही इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. मेहुल चोक्सीविरोधात ईडीने 2 जुलै रोजी पीएमएलए कायद्याखाली नोंदवलेल्या गुन्ह्यांसंदर्भात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली होती. त्यात पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेचा व्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, गीतांजली ग्रुपच्या बँकिंग ऑपरेशन्सचा उपाध्यक्ष विपुल चितलिया, जैन डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेडचा मालक धर्मेश बोथ्रा, गीतांजली जेम्स लिमिटेडचा संचालक सुनील वर्मा, ब्रिलियंट डायमंड लिमिटेड कंपनीतील जयेश शाह यांच्या नावांचाही समावेश होता. यानंतर पीएमएलए न्यायालयाने या सर्वांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता.

काही दिवसांपुर्वी मेहुल चोक्सीचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये त्याने ईडी आणि सीबीआयने केलेले सगळे आरोप चुकीचे आहेत. मला घोटाळ्यात अडकवले जाते आहे आणि माझी मालमत्ता चुकीच्या पद्धतीने सील करण्यात आली आहे असा आरोप केला होता. पीएनबी घोटाळ्यात फरार झालेला नीरव मोदी याचा हा मामा आहे. अँटिग्वा या ठिकाणी मेहुल चोक्सी वास्तव्यास आहे. या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच मेहुल चोक्सीचा व्हिडिओ समोर आला होता.

एवढेच नाही तर मी आत्मसमर्पण करण्यास तयार असल्याचे सांगण्यात येते आहे ज्यातही कोणतेच तथ्य नाही असेही मेहुल चोक्सीने म्हटले होते. मला जाणीवपूर्वक घोटाळ्यात अडकवले गेले आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत असे मेहुल चोक्सी या व्हिडिओत सांगत होता.