‘कॅम्पाकोला’ कंपाऊंडमधील सात इमारतींचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली असून, गुरुवारी सकाळपासून कारवाईसाठी पूर्वतयारी करण्यास सुरुवात झालीये. कारवाईवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अपडेट्स

  • कॅम्पाकोलामधील नागरिकांचा कारवाईला विरोध. परिसरात होम हवन सुरू, गायत्री मंत्राचा जप.
  • घरकाम करणा-या महिलांची पालिकेच्या विरोधात बिल्डिंगच्या कंपाऊंडबाहेर निदर्शने.
  • पालिका अधिकारी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे पथक कॅम्पाकोला कपाऊंड परिसरात दाखल.
  • न्यायालयाच्या निर्णयाबाबत आम्हाला माहिती नाही, आम्ही आमची कारवाई करणार – पालिका अधिकारी चव्हाण
  • अग्निशमन दलासही सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • अनधिकृत सदनिकांची गॅस आणि वीज जोडणी पहिल्यांदा तोडण्यात येणार असल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.
  • कारवाईच्या पहिल्या टप्प्यात सदनिकांमधील स्वयंपाकघर आणि स्नानगृह तोडले जाणार आहे.
  • दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे स्लॅब व पिलर तोडले जाणार आहेत.
  • सात इमारतींमधील अनधिकृत ३५ मजल्यांवरील १४० सदनिका तोडण्यात येणार असून, हे बांधकाम पाडण्यासाठी ८० कामगारांचा वापर केला जाणार आहे.
  • कारवाई सुरू करण्यापूर्वी येथील अनधिकृत सदनिकांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना घर रिकामे करण्याविषयी सूचना देण्यात येणार आहेत. रहिवाशांनी ऐकले नाही तर कारवाई करण्यासाठी त्यांना बळजबरीने घराबाहेर काढले जाण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली असल्याचे समजते.
     

लता मंगेशकर यांच्या नावेही फ्लॅट
प्रतिनिधी, मुंबई</strong>
‘कॅम्पा कोला कंपाउंड’मध्ये गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या नावेही फ्लॅट असल्याचे आणि तोही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरविलेल्या फ्लॅट्सच्या यादीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्या फ्लॅटवरही पालिकेचा हातोडा पडणार आहे.
‘कॅम्पा कोला’तील ‘इशा हौ. सोसायटी’मध्ये लता मंगेशकर यांच्या नावे ८०२ क्रमांकाचा फ्लॅट आहे. लता मंगेशकर यांच्या नावे फ्लॅट असला तरी पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा मुलगा आदिनाथ तेथे राहतो. सोसायटीच्या नोंदीमध्ये लता मंगेशकर या फ्लॅटधारक, तर आदिनाथ आणि कृष्णा मंगेशकर हे सोसायटी सदस्य आहेत, अशी माहिती ‘सेव्ह कॅम्पा कोला’ मोहिमेच्या सदस्य नंदिनी मेहता यांनी दिली.

रहिवाशांचे उपोषण; संघर्षांचा निर्धार
प्रतिनिधी, मुंबई
‘कॅम्पाकोला’ कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ स्थानिक रहिवाशांनी बुधवारपासून येथे उपोषण सुरू केले आहे. बांधकाम पाडले जाऊ नये त्यासाठी रहिवाशांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात संघर्ष करण्याचे ठरविले असून कारवाईसाठी कोणालाही ‘कॅम्पा कोला’च्या आवारात पाऊल टाकू न देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे गुरुवारी कारवाईच्या वेळेस येथे रहिवासी आणि महापालिका प्रशासन यांच्यात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे.
गुरुवारपासून अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईस सुरुवात होणार आहे. कारवाईसाठी महापालिका यंत्रणाही सज्ज झाल्याने गुरुवारी नेमके काय घडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महापालिकेने रहिवाशांना नोटीस पाठवून आपले काम केले असले तरी अद्याप एकाही रहिवाशाने सदनिकेचा ताबा सोडलेला नाही. या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारपासून दहा रहिवाशांनी येथे उपोषण सुरू केले असून, गुरुवारी आणखी रहिवासी यात सहभागी होतील. बांधकाम पाडले जाऊ नये म्हणून रहिवासी प्रखर विरोध करतील. कारवाईसाठी कोणालाही आत पाऊल टाकू दिले जाणार नाही, असा इशारा स्थानिकांच्या वतीने नंदिनी मेहता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.