मुंबई : मेळघाटमध्ये सुरू असलेल्या ‘उलगुलान’ या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (नीट) यश मिळवले आहे. ‘नीट’ परीक्षेच्या तयारीसाठी शिकवण्यांवर पैसे खर्च करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत मोफत प्रशिक्षण दिले जाते.

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ ही संस्था सुरू केली. बी. जे.मधील विद्यार्थी, माजी विद्यार्थी ‘नीट’ देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतात. ही संस्था एकात्मिक आदिवासी विभागाच्या सहकार्याने मेळघाट येथे ‘उलगुलान’ हा उपक्रम राबवते. यंदा या उपक्रमात ३४ विद्यार्थी होते. ते सर्व प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

गुणवत्ता यादीचा अंदाज घेतल्यास मेळघाट येथील १८ विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीएएमएस, दंतवैद्यक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकेल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे प्रशिक्षण वर्ग चालतात. त्यात यंदा ४२ विद्यार्थी होते. त्यातील १७पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी तर १४ ते १६ विद्यार्थ्यांना बीएएमएस, बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकेल, अशी माहिती संस्थेच्या स्वयंसेवकांनी दिली.

मेळघाटमधील विद्यार्थी डॉक्टर झाले तर तेथील अनेक प्रश्न भविष्यात कमी होतील. यादृष्टीने तेथील विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’चे मोफत निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. या प्रकल्पासाठी आदिवासी विकास विभागाच्या तत्कालीन प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी खूप सहकार्य केले.

– डॉ. अतुल ढाकणे, विश्वस्त