महालक्ष्मी मंदिरासमोर असलेल्या तुळशीदास गोपाळदास चॅरिटेबल ट्रस्ट (टीजी पॅव्हेलियन ट्रस्ट)मधील एक प्रमुख विश्वस्त दत्ता कोठावळे (४०) याला महिलेच्या बलात्कारप्रकरणी गुरुवारी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर मंदिराच्या आवारातील विक्रेत्या महिलेवर गेली पाच महिने बलात्कार करून, तिची अश्लील चित्रफीत तयार केल्याचा गुन्हा गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कोठावळे याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले असण्याची शक्यता असून मोठे सेक्स स्कँडल उघडकीस येण्याची शक्यता गावदेवी पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या समोर तुळशीदास गोपाळदास चॅरिटेबल ट्रस्ट असून तो टीजी पॅव्हेलियन नावाने प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर, लग्नाचे सभागृह आणि मैदानाची देखरेख या ट्रस्टमार्फत पाहिली जाते. या ट्रस्टतर्फे मंदिराच्या आवारात विक्रेत्यांना स्टॉल लावण्यास देण्यात आले आहेत.  त्यांच्याकडून दिवसाला ८ ते १० हजार रुपये वसूल केले जातात.
यापैकी एका महिलेने गावदेवी पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ट्रस्टमधील एक विश्वस्त दत्ता कोठावळे याने आपले लैंगिक शोषण करून अश्लील चित्रफितीच्या आधारे ब्लॅकमेल केल्याची तक्रार या महिलेने गावदेवी पोलीस ठाण्यात केली आहे. गावदेवी पोलिसांनी याप्रकरणी (भादंवि १७२/ २०१२) नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून फरार असलेल्या दत्ता कोठावळे याला मुंबई सेंट्रल येथून गुरुवारी संध्याकाळी गावदेवी पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी माहिती देताना गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोणंदकर म्हणाले की, ही महिला विवाहित असून तिचा या मंदिर परिसरात स्टॉल आहे. पाच महिन्यांपूर्वी विश्वस्त कोठावळे याने तिला भेटण्यासाठी बोलावले आणि गुंगीचे औषध टाकून तिला बेशुद्ध केले. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्या वेळी त्याने तिची अश्लील चित्रफीतही तयार केली. या चित्रफितीच्या आधारे तो या महिलेला वारंवार धमकावून तिच्यावर बलात्कार करीत होता. शेवटी त्रस्त झाल्याने तिने तक्रार दाखल केली. मंदिराच्या आवारात केवळ याच कामासाठी फेरीवाल्या महिलांना जागा दिली जात असावी, असे लोणंदकर यांनी सांगितले. कोठावळे याने अनेक महिलांचे याच पद्धतीने लैंगिक शोषण केले असण्याची शक्यता असून त्याचा आम्ही तपास करीत आहोत, असेही लोणंदकर यांनी सांगितले.
कोठावळे याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोठावळे हा प्रमुख विश्वस्त असून तो ट्रस्टचा सर्व कारभार पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश काकडे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.