स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतर घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे म्हणून मागणी जोर धरू लागली असली तरी स्मारकामुळे ‘सार्वजनिक क्रीडा स्थान’ म्हणूनच आरक्षित असलेले हे मैदान आपली ओळख हरवून बसेल, असाच मतप्रवाह आहे. परिणामी चैत्यभूमीच्या विकासासाठी राज्य शासन मागणी करीत असलेल्या इंदू मिलच्या निम्म्या जागेवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारावे अशी मागणी चक्क दादरकरांकडूनच करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यापूर्वी १९२५ मध्ये १.१ किलोमीटर परिघात विस्तारलेले हे मैदान जनतेसाठी खुले केले. त्यावेळी हे मैदान माहीम पार्क म्हणून परिचित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त १९२७ मध्ये या मैदानाला शिवाजी पार्क नाव देण्यात आले. हे मैदान ‘सार्वजनिक क्रीडा स्थान’ म्हणूनच आरक्षित करण्यात आले होते. त्यावेळी अनेक जण या मैदानावर खेळण्यासाठी येत असत. देशात १९४२ च्या सुमारास स्वातंत्र्य चळवळीने वेग घेतला होता. शिवाजी पार्कवर सायंकाळी सभा-बैठका होऊ लागल्या. परंतु मैदानाचा वापर दिवसा खेळण्यासाठी आणि रात्री सभांसाठी केला जायचा. सभांमुळे खेळण्यास येणाऱ्या मुलांची अडवणूक केली जात नव्हती. सायंकाळीच उभारण्यात येणारे व्यासपीठ सभा पार पडल्यानंतर तात्काळ आवरण्यात येत होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी शिवाजी पार्कवर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज घूमला. त्यामुळे या मैदानाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. शिवाजी पार्कचा वापर क्रीडा प्रकारांसाठी व्हावा, तसेच तेथे अतिक्रमण होऊ नये यासाठी मैदानातील काही भाग ३८ संस्थांना भाडेपट्टय़ाने देण्यात आला असून या परिसरातील ११ शाळांचा त्यात समावेश आहे. शारिरीक शिक्षणासाठी या शाळांकडून मैदानाचा वापर करण्यात येत आहे. शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आणि उद्यान गणेश मंदिर वगळता उर्वरित सर्व संस्था क्रीडा क्षेत्राशी निगडीत आहेत. काळानुरुप सभांचे स्वरुप बदलू लागले आणि शक्तीप्रदर्शनाच्या बैठका तेथे होऊ लागल्या. केवळ सभाच नव्हे तर मैदानामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले. पुस्तक प्रदर्शन, खाद्य महोत्सवासाठीही हे मैदान खुले झाले. काही ठेकेदारांनी मैदानात आपली मक्तेदारी बनविली आहे. पालिकेची परवानगी मिळवून देण्यापासून मंडप उभारण्यापर्यंतची सर्व कामे हे ठेकेदार आयोजकांना करून देत आहेत. २००८ मध्ये ३६५ दिवसांपैकी १६५ दिवस विविध कार्यक्रम या मैदानात पार पडले. त्यामागे या ठेकेदारांचाच मोठा हात होता.
शिवाजी पार्कच्या सभोवताली शाळा, रुग्णालये, नर्सिग होम्स आहेत. सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या भागात शांततेचा भंग होत होता. त्यामुळे शिवाजी पार्कचा शांतताक्षेत्रात समावेश करण्याची मागणी ‘वेकॉम’ संस्थेकडून करण्यात आली होती. परंतु महापालिकेने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ‘वेकॉम’ने २००९ मध्ये न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाने शिवाजी पार्कचा समावेश शांतताक्षेत्रात करण्याचा आदेश दिला. मात्र याबाबतचा खटला अद्यापही न्यायप्रविष्ट आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी गेली ४२ वर्षे याच मैदानावर दसरा मेळाव्यात आपल्या विचारांचे सोने उधळले. त्यांची ही परंपरा लक्षात घेऊन शिवाजी पार्कवर त्यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र यापूर्वी या मैदानावर माँसाहेब मीनाताई ठाकरे, संगीतकार वसंत देसाई आणि संगीतकार सी. रामचंद्र यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. हे खेळाचे मैदान असल्यामुळे तेथील पुतळे अन्यत्र हलविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत असतानाच आता शिवसेनाप्रमुखांचे तेथे स्मारक उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
मात्र त्यास दादरकर दबक्या आवाजात विरोध करू लागले आहेत. शिवाजी पार्कऐवजी इंदू मिलची निम्मी जागा शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी द्यावी आणि निम्म्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी काही मंडळींकडून करण्यात येत आहे.