नेरुळ- खारकोपर उपनगरीय रेल्वेचाही आरंभ 

पनवेल ते पेण मार्गावर रविवार, ११ नोव्हेंबरपासून डेमू ऐवजी मेमू इंजिनाची जोड असलेल्या लोकल गाडय़ा धावणार आहेत. नुकतेच या मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. मेमू सेवेचे उद्घाटन रविवारी खारकोपर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत होईल. याशिवाय खारकोपर-नेरुळ ही नवीन उपनगरीय सेवाही उद्यापासूनच प्रवांशाच्या सेवेत रुजू होणार आहे.

मध्य रेल्वेने पनवेल ते पेण या मार्गावर हाती घेतलेले विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे याआधी पनवेल-पेण मार्गावर डिझेलवर धावणाऱ्या डेमूऐवजी विद्युत प्रवाहावारील मेमू इंजिनावरील गाडय़ा धावतील. त्यामुळे गाडय़ांचा वेग वाढेल आणि प्रदूषण होणार नाही. शिवाय इंधनबचत होईल आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी होईल.

पनवेल ते पेणमध्ये ओव्हरहेड वायरचे सुमारे दोन हजार खांब, पुलांचे २३ सांगाडे, १०० पेक्षा जास्त मल्टी ट्रॅक पोर्टल, एक बोगदा बांधण्यात आला आहे. त्यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. दिवा ते वसई आणि दिवा ते पनवेल ते रोहा मार्गावरही मेमू धावणार आहे. बारा डब्यांच्या गाडय़ा प्रवाशांसाठी फायदेशीर ठरतील. या सेवेची सुरुवातही रविवारी होणार आहे.

याशिवाय अनेक वर्षांपासून रखडलेल्या नेरुळ ते उरण या नव्या रेल्वे मार्गामधील पहिला टप्पा असलेला नेरुळ ते खारकोपर रेल्वे मार्गावर रविवारी पहिली लोकल धावणार आहे. रेल्वेमंत्री गोयल खारकोपर स्थानकात पहिल्या लोकलला हिरवा कंदील दाखवतील. त्यानंतर सोमवारपासून नियमितपणे ही सेवा सुरू होईल.

पादचारी पुलांचेही उद्घाटन

परेल स्थानकातील नवीन फलाट, शिवडी, मुंब्रा, भांडुप, परेल, कळवा आणि घाटकोपर स्थानकात बांधलेले सहा पादचारी पूल, उंची वाढवलेले २७३ फलाट, २३ स्थानकांत बसविण्यात आलेले ४१ सरकते जिने, सहा स्थानकांतील १०उद्वाहने, सहा स्थानकांतील नवीन शौचालये, ७७ स्थानकांतील ३१८ एटीव्हीएम यंत्रे, सहा स्थानकांतील २०६ सीसीटीव्ही कॅमेरे यासह अन्य काही सेवा-सुविधांचे उद्घाटनही रविवारी करण्यात येणार आहे.