शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : रोगप्रतिबंधकशक्ती कमी झालेल्या एचआयव्हीबाधितांमधील क्षयरोग आणि मेंदूज्वराचे निदान आता त्वरित केले जाणार आहे. यासाठीच्या प्रगत चाचण्या मुंबईतील प्रत्येक अण्टी रेट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांवर मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीने (एमडॅक्स) १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनानिमित्ताने उपलब्ध केल्या आहेत. भारतात प्रथम या चाचण्या मुंबईत सुरू होत असून यामुळे एचआयव्हीबाधितांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

व्यक्तीची रोगप्रतिबंधक शक्ती सीडीफोर लिम्फोसाईट या पांढऱ्या रक्तपेशीच्या संख्येवरून मोजली जाते. एचआयव्ही विषाणू या सीडीफोरवर हल्ला करत असल्याने या रुग्णांमधील रोगप्रतिबंध शक्ती कमी होते आणि इतर आजारांची बाधा होण्याचा धोका अधिक असतो. सीडीफोर २०० च्या खाली असणाऱ्या एचआयव्हीबाधितांमधील क्षयरोग आणि मेंदूज्वराच्या आजाराचे निदान काही मिनिटांत करणाऱ्या चाचण्या एमडॅक्सने शहरात सुरू केल्या आहेत.

क्षयरोगाची चाचणी ही मुख्यत: थुंकीद्वारे केली जाते. परंतु यात केवळ फुफ्फुसांच्या क्षयरोगाचे निदान होते. शरीरातील इतर भागातील क्षयरोगाचे निदान करण्यासाठी मूत्रचाचणी उपलब्ध केली आहे. ही चाचणी गर्भधारणाच्या चाचणी इतकी सोपी असून लगेचच निदान केले जाते. मेंदूज्वराची चाचणी करण्यासाठी पाठीच्या मणक्यातून द्रवाची तपासणी केली जाते. यासाठी रुग्णाला रुग्णालयात दाखल व्हावे लागते. अनेकदा फेऱ्या घालाव्या लागतात. एचआयव्हीबाधित रुग्णांच्या दृष्टीने हे गैरसोईचे असते. परंतु आता या नव्या चाचणीद्वारे रक्तगटाच्या तपासणीप्रमाणे बोटावरील रक्त घेऊन चाचणी करण्यात येणार आहे, असे एमडॅक्सच्या प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले.

इतर रुग्णांमध्ये या चाचण्या फारशा फायदेशीर नसून एचआयव्हीबाधितांमध्ये या चाचण्यांची अचूकता अधिकांश आहे. एचआयव्हीबाधितांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण अधिक आहे.

साडेतीन हजार रुग्णांच्या चाचण्या

या चाचण्या नॅकोने शिफारस केलेल्या आहेत. परंतु भारतात प्रथम मुंबईत सुरू होत आहेत. मुंबईत सध्या १९ एआरटी केंद्र कार्यरत आहेत. मुंबईत सुमारे साडे तीन हजार रुग्णांचा सीडीफोर २०० पेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे हे रुग्ण उपचारासाठी येत असलेल्या एआरटी केंद्रावरच चाचण्या उपलब्ध झाल्याने रुग्णाचे तातडीने निदान आणि उपचार सुरू होईल, असेही डॉ. आचार्य यांनी व्यक्त केले.

किशोरवयोगटातील एचआयव्ही बाधितांचा ‘मितवा’

ज्या मुलांना त्यांच्या पालकांपासून एचआयव्हीचा संसर्ग झालेला आहे, अशी मुले आता किशोरवयोगटात असून यांचे कुटुंब, सामाजिक पातळीवर अनेक समस्या असतात.  अनेकांचे पालक हयात नसतात, तेव्हा अशा मुलांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात. या मुलांच्या अडचणी समजून घेणे, उपचार घेण्यास प्रोत्साहन देणे अशा सर्वच पातळीवर काम करण्यासाठी एरआरटी केंद्रावर कार्यशाळा सुरू करणार आहेत. या उपक्रमाला ‘मितवा’ असे नाव दिले आहे. आठवडय़ातून एक दिवस य्त्यांच्याशी संवाद साधला जाईल, असे डॉ. आचार्य यांनी सांगितले.