निसर्गदत्त सौंदर्याला आणखीनच खुलवण्यासाठी स्त्रिया ज्या काही आयुधांचा वापर करतात, त्यातील मुख्य आयुध म्हणजे दागदागिने! मात्र रेल्वेमधील चोरीच्या प्रकरणांकडे एकवार नजर टाकल्यास हे आयुध पुरुषच जास्त वापरत असल्याचे लक्षात येते. कारण गेल्या वर्षभरात रेल्वेत दागिने चोरी झाल्याच्या घटनांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे दागिने जास्त चोरीला गेले आहेत. या दागिन्यांत गळ्यातील साखळी, ब्रेसलेट आदींचा समावेश जास्त आहे.
गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दागिने चोरीच्या २४० घटना घडल्या. यापैकी ८५ तक्रारी स्त्री प्रवाशांकडून प्राप्त झाल्या असून त्यात मंगळसूत्र, सोन्याचे हार, बांगडय़ा आदी दागिने चोरीला गेल्याचा समावेश आहे. तर उर्वरित १५५ तक्रारी पुरुष प्रवाशांकडून प्राप्त झाल्याचे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले. आता पुरुष सर्रास सोन्याची साखळी, ब्रेसलेट असे दागिने घालतात.
त्यातच वाढलेल्या गर्दीचा फायदा हे चोरटे घेत असून त्यामुळेच कदाचित पुरुषांच्या डब्यांत हे प्रकार वाढले असावेत, असा कयासही भालोदे यांनी व्यक्त केला.
याआधी पुरुषांच्या डब्यात पाकीटमारी, मोबाइल चोरी आदी घटना अगदी सर्रास होत होत्या. मात्र गेल्या वर्षांपासून दागिने चोरीमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

* मध्य रेल्वेवर दागिने चोरीच्या सर्वाधिक घटना कुर्ला स्थानकात घडतात.
* ठाणे, कल्याण आणि दादर या स्थानकांमध्येही चोरीच्या घटनांचे प्रमाण जास्त.
* या चारही स्थानकांवर मोठय़ा प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे तैनात असून त्या कॅमेऱ्यातील चित्रिकरणाद्वारे काही माहिती हाती येते का, याचा शोध घेतला जाणार आहे.