24 January 2019

News Flash

मनोविकाराचा विळखा

महापालिकेच्या १५ उपनगरीय रुग्णालयांमध्ये आलेल्या सुमारे साडेपाच लाख ३३ टक्के रुग्ण हे तापाचे होते

पालिका रुग्णालयात सर्वाधिक रुग्ण मनोविकाराचे; उपनगरीय रुग्णालयात तापाचे रुग्ण जास्त

मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब अशा आजारांपेक्षाही रुग्णांना विविध मानसिक आजारांचा सामना करावा लागत असल्याचे महानगरपालिकेच्या दोन वर्षांच्या पाहणीत आढळून आले आहे. पालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये दोन वर्षांत आलेल्या साडेपाच लाखांहून अधिक रुग्णांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे, तर पालिकेच्या १५ उपनगरीय रुग्णालयांमध्ये आलेल्या सुमारे साडेपाच लाख रुग्णांमध्ये तापाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. क्षयरोगासाठी वेगळी यंत्रणा असल्याने त्या रुग्णांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले.

मुंबईसारख्या मेट्रोसिटीमध्ये मानसिक ताणतणाव वाढले असल्याचा ढोबळ अंदाज आतापर्यंत व्यक्त करण्यात आला होता, मात्र पहिल्यांदाच पाहणीतूनही त्याला सबळ पुरावा मिळाला आहे. महापालिकेची चार प्रमुख रुग्णालये, १५ उपनगरीय रुग्णालये आणि १७५ दवाखान्यांमध्ये ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीदरम्यान आलेल्या ७२ लाख ६१ हजार १३० रुग्णांच्या तसेच सात दिवस प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन आणखी १ लाख १३ हजार ४७२ रुग्णांच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला.

या अहवालानुसार महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक म्हणजे ३१ टक्के रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित होते, तर त्याखालोखाल रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रत्येकी २३ टक्के रुग्ण होते. उपनगरीय रुग्णालयांमध्ये आणि दवाखान्यांमध्येही जीवनशैलीशी निगडित आजारांचे प्रमाण अधिक होते.

महापालिकेच्या १५ उपनगरीय रुग्णालयांमध्ये आलेल्या सुमारे साडेपाच लाख ३३ टक्के रुग्ण हे तापाचे होते, मात्र तापाच्या निश्चित कारणांची नोंद झालेली नाही. याखालोखाल मधुमेह १९.८४ टक्के, रक्तदाब १६.०२ टक्के रुग्णांमध्ये आढळला. महत्त्वाचे म्हणजे श्वानदंशाचे ५५ हजार ७१९ (९.८७ टक्के) रुग्ण या १५ रुग्णालयांमध्ये आले होते. क्षयरोग किंवा एचआयव्ही एड्ससारख्या आजारांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याने त्यांचा समावेश या अभ्यासात करण्यात आला नव्हता.

महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवांची भविष्यातील दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. शीव रुग्णालयातील समुदाय औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा बनसोडे-गोखे यांच्या मार्गदर्शनाखाली ५१ तज्ज्ञ डॉक्टर सात महिने यावर काम करत होते. भविष्यात मनपा रुग्णालये व दवाखान्यामध्ये होणारी मनुष्यबळ नियुक्ती, औषध-गोळ्यांचा साठा इत्यादींसाठीही या अहवालाचा उपयोग होऊ  शकेल, अशी माहिती डॉ. बनसोडे-गोखे यांनी दिली.

उपनगरीय रुग्णालयांमधील अभ्यास

* दोन वर्षांच्या कालावधी दरम्यान आलेल्या ५ लाख २६ हजार ६०५ रुग्णांची माहिती अभ्यासण्यात आली.

* तापाचे सर्वाधिक म्हणजे ३३.१७ टक्के रुग्ण (तापाच्या निश्चित कारणाची नोंद नसली तरी हे रुग्ण मलेरिया, डेंग्यू, हिवताप किंवा व्हायरल फिव्हरचे असू शकतात).

* याखालोखाल मधुमेह १९.८४ टक्के ,

* रक्तदाब : १६.०२ टक्के ,

* श्वानदंश : ९.८७ टक्के ,

* मनोविकार : ८.२४ टक्के ,

* दमा : ६.११ टक्के ,

* जुलाब : २.४७ टक्के ,

* डेंग्यू : २.०३ टक्के ,

हिवताप : १.२६ टक्के आणि विषमज्वराच्या ०.९८ टक्के.

प्रमुख रुग्णालयांतील अभ्यास

* ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या दरम्यान आलेल्या ५ लाख ५९ हजार ९५४ रुग्णांची माहिती तपासण्यात आली.

* सर्वाधिक ३१.१४ टक्के रुग्ण मनोविकारांचे.

* मधुमेहाचे २३ टक्के आणि रक्तदाबाचेही २३ टक्के

* हृदयविकाराचे साडेसात टक्के

* डेंग्यू – १.५ टक्के

*ताप – १.३८ टक्के

* दमा – १.४ टक्के

* हिवताप – ०.५३ टक्के

* जुलाब – ०.६१ टक्के

दवाखान्यांमधील अभ्यास

महापालिकेचे १७५ दवाखाने आहेत. उपचारांसाठी येऊन गेलेल्या ६१ लाख ७४ हजार ५७१ रुग्णांची माहिती अभ्यासण्यात आली. त्यापैकी ३९ लाख ६५ हजार ४० रुग्णांच्या (६४.२२ टक्के ) आजाराची नेमकी नोंद नव्हती. २०.५९ टक्के  रुग्ण सर्दी-खोकला-तापाचे. ताप ४.७८ टक्के, जुलाब ३.०५ टक्के, मधुमेह २.७५ टक्के, रक्तदाब २.३३ टक्के, श्वान किंवा प्राणीदंश १.०५ टक्के, दमा ०.८४ टक्के, रक्तयुक्त जुलाब ०.२६ टक्के, हिवताप ०.०८ टक्के, डोळे येणे ०.०५ टक्के.

First Published on April 17, 2018 4:05 am

Web Title: mental disorders patients more in the bmc hospital