21 October 2019

News Flash

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘मानसिक आरोग्य प्राधिकरणा’ची स्थापना!

मानसिक आरोग्य प्राधिकरणाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

|| संदीप आचार्य

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांमधील वाढते नैराश्य, लहान मुलांच्या मानसिक समस्या यासह एकूणच वाढलेल्या मानसिक आजारांना शिस्तबद्ध पद्धतीने अटकाव करण्यासाठी राज्यात ‘मानसिक आरोग्य प्राधिकरणा’ची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणावर एकूण वीस सदस्य असून राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी मानसोपचार करणाऱ्या संस्थांचे नियमन या प्रधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अशाप्रकारने मानसिक आरोग्य प्राधिकरणाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

प्राधिकरणाच्या स्थापनेनंतरची पहिली बैठक बुधवारी, ५ डिसेंबर रोजी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रधिकरणावर एकूण वीस सदस्य असतील. मानसिक आजारग्रस्त व्यक्तींचे दोन प्रतिनिधी, मानसिक आजार क्षेत्रात काम करणाऱ्या दोन संस्थांचे प्रतिनिधी आणि मनोरुग्णांना सेवा देणाऱ्या अशासकीय संस्थांच्या दोन प्रतिनिधींचा यामध्ये समावेश आहे. याबाबतचा कायदा राज्यात ७ जुलै २०१८ रोजी अस्तित्वात आल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यात ही प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

केंद्राने मंजूर केलेल्या कायद्याचा अभ्यास करून राज्यासाठी आवश्यक असलेली नियमावली तयार करणे, प्रत्येक जिल्ह्य़ात प्राधिकरणाचे मंडळ स्थापन करणे तसेच राज्यातील सर्व मानसिक आरोग्य संस्थांचे नियमन व नोंदणी करणे ही जबाबदारी पार पाडली जाणार आहे. याशिवाय मानसिक आजारावरील उपचाराचा दर्जा वाढवणे आणि प्रभावी सेवा देण्यासाठी योजना आखणे, मानसिक आरोग्य कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधितांना प्रशिक्षण देणे तसेच संबंधित संस्थांची नियमित तपासणी करणे आदी जबाबदाऱ्या प्राधिकरणाकडून पार पाडल्या जाणार आहेत. राज्यात आरोग्य विभागाच्या अखत्यारित चार मानसिक रुग्णालये असून तेथील एकूण खाटांची संख्या ५ हजार ६९५ इतकी आहे. या रुग्णालयांमध्ये वर्षांकाठी १ लाख ८० हजार रुग्णांवर बाह्य़रुग्ण विभागात उपचार केले जातात.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्यासाठी एक व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेण्यात येणार असून आगामी काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करून व्यापक  उपाययोजना केल्या जातील. मानसिक आरोग्य कार्यक्रमाला बळकटीकरण देण्यासाठी प्राधिकरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. – डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव आरोग्य

First Published on December 7, 2018 1:17 am

Web Title: mental health authority for to stop farmer suicides