प्रत्येक करोनाबाधिताच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात यावी, असे आरोग्य विभागाने सूचित केले आहे. तसेच करोनाबाधित रुग्णांच्या मानसिक आजारांचे निदान करण्यासाठी डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे आदेशही यात दिले आहेत.

करोनाबाधितांमध्ये उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याबाबत आरोग्य विभागाने समिती गठित केली होती. या समितीने नुकतीच ही मार्गदर्शक तत्त्वे शासनाला सादर केली आहे. त्यानुसार उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

रुग्णालयाव्यतिरिक्तही उपचार घेत असलेल्या प्रत्येक करोनाबाधिताची तपासणी करून मानसिक समस्या आहेत का, याची पडताळणी करावी. असे रुग्ण आढळल्यास तातडीने मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठवावे. तज्ज्ञांनी अशा मनोरुग्णांसाठी स्वतंत्र उपचार पद्धतीचे नियोजन करावे. तसेच प्रत्येक रुग्णाच्या सर्व माहितीची मानसोपचारतज्ज्ञांनी नोंद ठेवावी, असेही सूचित केले आहे. करोना काळात ज्येष्ठ नागरिक, बालके आणि गरोदर मातांमध्ये मानसिक ताण निर्माण होण्याचा संभव अधिक असल्याने या वर्गात मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यावर भर द्यावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

मार्गदर्शक तत्त्वे..

* करोनाबाधित रुग्णांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी रुग्णालयात मानसोपचार किंवा मानसशास्त्रज्ञांनी प्रत्येक रुग्णांचे आठवडय़ातून एकदा समुपदेशन करावे.

* रुग्णातील मनोविकारांचे निदान करण्यासाठी संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. रुग्णांसाठी प्रशिक्षणही उपलब्ध करावे.

* आत्महत्या करण्याचा याआधी प्रयत्न केलेले किंवा तसे विचार येत असलेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करून तपासणी केली जावी. मानसोपचारतज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जावेत.

* औषधे त्यांच्याजवळ न ठेवता देखरेखीखाली दिली जावीत. तसेच इतर आवश्यक त्या उपायोजना केल्या जाव्यात.

* सातत्याने सेवा देत असलेले डॉक्टर, परिचारिका यांच्यासह आरोग्य कमर्चारी यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा हा तणाव दूर केला जाईल, यासाठीही उपाययोजना केल्या जाव्यात.

* रुग्णालयात मानसोपचार किंवा मानसशास्त्रज्ञ उपलब्ध नसल्यास खासगी सेवा देत असलेले तज्ज्ञांची नेमणूक करावी. त्यांचे मानधन  करोना निधीतून दिले जाईल, असेही यात स्पष्ट केले आहे.