उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई : मुंबई सेन्ट्रलकडे जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या छतावर एक मनोरुग्ण चढल्यामुळे गुरुवारी सकाळी ही गाडी बोरिवली स्थानकात अर्धा तास रखडली. या मनोरुग्णाला उतरवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाला मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे बोरिवली स्थानकात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या या घटनेमुळे उपनगरी रेल्वेही खोळंबल्या.

नवी दिल्ली ते मुंबई सेन्ट्रल राजधानी एक्स्प्रेसला सिग्नल लागल्याने ही गाडी सकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास दहिसर स्थानकाजवळ थांबली. त्याचवेळी या गाडीच्या छतावर एक मनोरुग्ण चढला. या घटनेची माहिती लोको पायलटला मिळाली. त्यांनी तात्काळ याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला कळवली. नियंत्रण कक्षाने बोरिवली स्टेशन मास्तर व रेल्वे पोलिसांना ही बाब निदर्शनास आणून दिली. बोरिवली स्थानकात गाडी आल्यानंतर ओव्हरहेड वायरला होणारा विद्युतपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर ३५ वर्षीय मनोरुग्णाला खाली उतरवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. ही गाडी खोळंबल्याने मागून येणाऱ्या जलद उपनगरी गाडय़ाही खोळंबल्या. त्यामुळे गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे उपनगरी रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले.