विविध आजारांवरील उपचारांवर कोटय़वधींचा खर्च

मानसिक ताणतणाव, मधुमेह, रक्तदाब इत्यादी आजारांनी राज्यातील अनेक आजी-माजी आमदार त्रस्त आहेत. सुमारे ६५ विद्यमान आमदारांनाही या आजाराने ग्रासले असून माजी आमदारांची संख्यादेखील लक्षणीय आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत आजी-माजी आमदारांच्या विविध आजारांवरील उपचारांवर सुमारे साडेबारा कोटी रुपये खर्च झाले असून आणखी सुमारे पाच कोटी रुपयांची बिले मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, कोटय़वधींच्या या आकडेवारीत, हजार-बाराशेच्या घरात उपचारांची बिले सादर करणारे काही आमदार म्हणजे, काळ्या ढगांची रुपेरी किनार ठरले आहेत. उपचारासाठी सरकारी तिजोरीतून मुक्तपणे निधी मिळत असतानादेखील या आमदारांनी जेमतेम अठराशे ते दोन हजार रुपये वैद्यकीय खर्च घेतलेला आहे. तर काही आजी-माजी आमदारांचा वैद्यकीय खर्च पाच लाखांपासून ४० लाखांपर्यंत गेला आहे.

विधानसभा व विधान परिषदेच्या आजी-माजी सदस्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय उपचारांचा खर्च शासनातर्फे दिला जातो. वेगवेगळ्या आजारांवर जेवढा खर्च होतो, तेवढय़ा खर्चाची बिले सादर केल्यानंतर तेवढी रक्कम त्यांना मिळते. त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. आरोग्य विभागाचे संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक, लेखा व कोषागर संचालनालयाचे संचालक आणि विधिमंडळातील सहसचिव, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीच्या मान्यतेनंतर आजी-माजी आमदारांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते.

राज्यात १ नोव्हेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत आजी-माजी आमदारांच्या वैद्यकीय उपचारांवर झालेल्या खर्चाचा तपशील माहिती अधिकारात मागण्यात आला होता. दोन ते अडीच वर्षांतील आजी-माजी आमदारांनी कोणत्या आजारासाठी कुठे उपचार घेतले, प्रस्ताव किती दिला होता आणि प्रत्यक्ष किती खर्चाला मंजुरी देण्यात आली, अशी तपशीलवार माहिती लेखा व कोषागारातून देण्यात आली आहे. त्यात काही आजी-माजी आमदारांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते. काही आमदारांच्या कुटुंबीयांच्या गंभीर आजारांवर मोठा खर्च झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार मागील दोन-अडीच वर्षांत आजी-माजी आमदारांच्या आजारावर बारा ते साडेबारा कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यात ६५ ते ७० आजी आमदारांचा समावेश आहे. आजी-माजी आमदारांच्या कुटुंबीयांनाही वैद्यकीय उपचाराचा खर्च दिला जातो, परंतु ती संख्या फार कमी आहे. अनेक आजी-माजी आमदारांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले असले तरी, सर्वाधिक मानसिक ताणतणावाने तसेच मधुमेह व रक्तदाबाने ते सर्वाधक त्रस्त असल्याचे कागदपत्रांवरून दिसते.

विविध आजारांवरील उपचाराचा खर्च १८०० रुपयांपासून ते १२ लाखांपर्यंत झालेला आहे. एका आमदाराच्या पत्नीने शासकीय रुग्णालयात घेतेलेल्या उपचाराची १८०० रुपये खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात आल्याची नोंद आहे. गेल्या अडीच वर्षांतील हा सर्वात कमी खर्च आहे. विधान परिषदेच्या एका माजी ज्येष्ठ सदस्याने औषधोपचारासाठी म्हणून दोन हजार रुपयांची बिले सादर केली, त्याला मंजुरी दिली आहे.

एका आजी सदस्य व त्याच्या कुटुंबीयांनी बहुतांश वेळा प्राथमिक उपचार केंद्रातच उपचार घेतला आहे. वेगवेगळ्या वेळी घेतलेल्या या उपचारांचा खर्च मात्र सहा ते सात लाख रुपयांच्या घरात आहे. एक माजी मंत्री व त्यांच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी एका डॉक्टराकडे घेतलेल्या उपचारावर सुमारे सहा लाखांच्या आसपास खर्च झाला आहे. राज्याचे अतिमहत्त्वाचे पद संभाळलेल्या एका माजी मंत्र्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सरकारी रुग्णालयांतील उपचारांवर सात ते साडेसात लाखांचा खर्च झाला आहे. आणखी एका माजी मंत्र्यांना ‘आजार नमूद नाही’ असा शेरा मारून सुमारे तीन लाख रुपयांचा वैद्यकीय उपचाराचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.

त्यांनी शासकीय रुग्णालयात वेगवेगळ्या वेळी उपचार घेतले आहेत. एका विद्यमान आमदाराचा व त्यांच्या कुटुंबीयांचा ४० लाख रुपयांवर खर्च गेला आहे. गेल्या अडीच वर्षांत सहा-सात वेळा घेतेलल्या उपचारांचा हा सर्वाधिक मोठा खर्च आहे.