बुध ग्रहाच्या सूर्यावरून होणाऱ्या अधिक्रमणाची पर्वणी सोमवारी सायंकाळी खगोलप्रेमींनी अनुभवली. उणा-पुऱ्या दोन तास चाललेली दुर्मीळ खगोलीय घटना पाहण्यासाठी मुंबईसह राज्यातील विविध ठिकठिकाणी अनेकांनी रांगा लावल्या होत्या. या वेळी बुध ग्रहाचा काळा ठिपका सूर्यावरून सरकताना दिसत होता, मात्र नाशिकला ढग आल्याने काहींचा हिरमोड झाला, मात्र इतर ठिकाणी बुध अधिक्रमणाचे सूर्यास्तपर्यंत अनेकांनी दर्शन घेतले.

सूर्य, पृथ्वी, बुध ग्रह एका सरळ रेषेत आल्याने झालेली स्थिती म्हणजेच ‘बुधाचे अधिक्रमण’ सोमवारी सायंकाळी अनेकांनी पाहिले. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ठीक ४ वाजून ४० वाजता बुध ग्रह सूर्यबिंबावर प्रथम स्पर्श करताना दिसू लागला. त्यानंतर काही मिनिटांतच हा ठिपका सूर्यबिंबावर आल्याचे दिसू लागले. ही घटना नागरिकांना दाखविण्यासाठी मुंबईसह अन्य उपनगरांमध्ये नेहरू तारांगण, खगोल मंडळ, यंग सायंटिस्ट डेन व अन्य खगोल अभ्यासक संस्थांनी पुढाकार घेतला होता. नेहरू तारांगणतर्फे वरळी सी-फेस येथे, तर खगोल मंडळातर्फे दादर, कल्याण, बदलापूर, नाशिक येथे ही घटना दाखविण्यासाठी चार ते आठ इंची दुर्बिणींची व्यवस्था केली होती. या दुर्बिणींना विशेष फिल्टर लावून अधिक्रमणाची घटना दाखविण्यात येत होती. मुंबईत सायंकाळी पावणेसातनंतर ढगांमुळे अधिक्रमण पाहताना अडचणी आल्या. तसेच नाशिकमध्ये गारांचा पाऊस होऊन गेल्याने सुरुवातीला येथे ढगांमुळे अनेकांचा हिरमोड झाला. काही वेळाने ढग गेल्यावर त्यांना अधिक्रमण पाहता आले.