दिल्ली येथील निझामुद्दीनजवळील मरकजमध्ये हजारो तबलिगी असून त्यापैकी काही करोनाबाधित असल्याची मूळ माहिती नगर पोलिसांना सुरुवातीला मिळाली. त्यानंतर याबाबतची खात्री करून राज्याच्या पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गुप्तवार्ता विभागाला अहवाल पाठवला. त्यानंतरच मरकज येथील हजारो तबलिगींना  बाहेर काढण्यास सुरुवात झाली, अशी विश्वसनीय माहिती बाहेर आली आहे.

हा गोपनीय अहवाल तात्काळ नगर पोलिसांनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांना पाठविला. अशी स्फोटक माहिती आल्यामुळे जैस्वाल यांनीही गोपनीयता पाळत चौकशी सुरू केली. या अहवालाची खातरजमा पटल्यानंतर जैस्वाल यांनी हा अहवाल केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या महासंचालकांना २६ मार्च रोजी दिला. तेथून मग सूत्रे हलली आणि दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. दिल्ली पोलिसांनी तात्काळ मरकजमध्ये जाऊन शोध घेतला तेव्हा त्यांना असे हजारोंच्या संख्येने तबलिगी एकत्र असल्याचे आढळले. परंतु विरोध झाल्याने त्यावेळी दिल्ली पोलिसांना कारवाई करता आली नाही. अखेर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा घेऊन दिल्ली पोलिसांनी या तबलिगींना बाहेर काढले. त्यानंतर लगेचच यापैकी अनेकांचे विलगीकरण करण्यात आले. नगर पोलिसांनी सतर्कता दाखविली नसती तर मरकज घटनेचा शोध लागलाच नसता, याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

झाले काय?

नाव न छापण्याच्या अटीवर गृह विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, देशात टाळेबंदी जाहीर होण्याआधीच राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदी घोषित केली होती. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना नगरमधील मुकुंदनगर येथील एका मशीदीत नेहमीपेक्षा अधिक हालचाल सुरू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी त्यावर पाळत ठेवली आणि माहिती मिळविली. मशीदीत प्रवेश केल्यावर तेथे १०-१२ परदेशी तबलिकी आढळले. त्यांची चौकशी केल्यावर निजामुद्दीन येथील तबलगींमध्ये करोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती मिळाली.