बदल्या झालेल्यांपैकी हजारो शिक्षक ‘विस्थापित’

मुंबई : शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ अद्यापही संपलेला नाही. राज्यातील हजारो शिक्षक ‘विस्थापित’ झाले आहेत. म्हणजे या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र कोणत्या शाळेवर रुजू व्हायचे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शाळा सुरू होण्यासाठी अवघे पंधरा दिवस राहिलेले असताना नेमके कोणत्या गावी, कोणत्या शाळेत जाऊन शिकवायचे याची कल्पनाच नसल्याने शिक्षक अस्वस्थ झाले आहेत.

गेल्या वर्षीपासून राज्यात शिक्षकांच्या बदल्या गाजत आहेत. राज्यातील शिक्षकांच्या जिल्ह्य़ांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांचा घाट ग्रामविकास विभागाने घातला. बहुतेक जिल्ह्य़ांमध्ये शिक्षकांना बदल्यांचे आदेश मिळाले आहेत. मात्र या बदल्यांमधील रोज नवा गोंधळ समोर येऊ लागला आहे. दिलेल्या पसंतीक्रमानुसार शाळा मिळाल्या नसल्याची तक्रार शिक्षकांची आहे. त्याच वेळी बदली तर झाली आहे, मात्र कुठे रुजू व्हायचे माहीत नाही अशा संभ्रमात राज्यातील हजारो शिक्षक आहेत. या शिक्षकांच्या जागी काम करण्यास दुसऱ्या बदलीपात्र शिक्षकांनी पसंती दिली. त्यानुसार नव्या शिक्षकांना या शाळेवर रुजू होण्याचे आदेशही आले. मात्र ज्या शिक्षकाऐवजी रुजू व्हायचे त्या शिक्षकांना दुसऱ्या शाळेचे आदेश आलेच नाहीत. अशा बदली होऊनही कोणत्याही शाळेत रुजू होण्याचे आदेश नसलेले प्रत्येक जिल्ह्य़ात सरासरी साडेतीनशे ते चारशे शिक्षक आहेत. राज्यातील अशा एकूण शिक्षकांची संख्या ही जवळपास दहा हजार असल्याचा अंदाज शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी एका जागेवर रुजू होण्याचे दोन किंवा तीन शिक्षकांना आदेश मिळाले आहेत. त्याचप्रमाणे एक विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची भलताच विषय शिकवणाऱ्या शिक्षकांच्या जागेवर बदली झाली आहे. बदली झाल्यानंतर आतापर्यंत शिक्षकांना बदलीसाठी भत्ता आणि रजा देण्यात येत होती. मात्र नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर बदल्या झाल्यामुळे ही रजा मिळण्याबाबतही संभ्रम आहे. अनेक शिक्षकांना प्रशासकीय बदली मिळालेली असतनाही आदेशात मात्र विनंती बदली असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बदलीसाठी आनुषंगिक लाभ मिळालेले नाहीत.

बदल्यांच्या या घोळाबाबत शिक्षकांच्या तक्रारी दिवसागणिक वाढत आहेत. राज्यातील शाळा सुरू होण्यासाठी अवघे पंधरा दिवस राहिले आहेत. मात्र आता कोणत्या गावात किंवा शाळेत जायचे आहे याची कल्पनाच हजारो शिक्षकांना अजूनही आलेली नाही. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी हा घोळ संपून शाळांचे कामकाज सुरळीत सुरू होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुन्हा न्यायालयात?

काही जिल्ह्य़ातील शिक्षकांनी गट करून बदलीच्या या प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता बदल्यांचीही प्रक्रिया पुन्हा एकदा न्यायालयीन प्रक्रियेच्या कचाटय़ात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. बदल्यांच्या याद्या विभागाने प्रसिद्ध केलेल्या नाहीत, त्याबाबतही शिक्षकांचे आक्षेप आहेत.

प्रशासकीय कामात अडथळा नको..

बदल्यांच्या प्रक्रियेबाबतची शिक्षकांमधील अस्वस्थता वाढत आहे. त्यामुळे ऑनलाइन बदल्यांचे हे कामकाज करणाऱ्या एनआयसी या कंपनीच्या कार्यालयात शिक्षक गर्दी करत आहेत. मात्र आता एनआयसीच्या कार्यालयात जाण्यास शिक्षकांना मज्जाव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बदल्यांची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वयकांशी संपर्क साधण्यासही शिक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. शिक्षकांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबी विभागाने शिक्षकांना दिली आहे.