पश्चिम रेल्वेमार्गावर Western Railway रविवारी मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ थोडक्यात टळला. वसई-नालासोपारा या स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री ही घटना घडली. यावेळी रेल्वे रूळांवर अज्ञात व्यक्तीकडून तब्बल आठ फुटांचा लोखंडी रॉड ठेवण्यात आला होता. मात्र, मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात थोडक्यात टळला. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास वसईहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी गाडी नालासोपारा स्थानकाजवळ येताच मोटरमन नितीन चंदनशिवे यांना रूळावर रॉड पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ गाडी थांबवत गार्डसह खाली उतरून रॉड रूळांवरून हटवला. लोकल कमी वेगात असल्यामुळे मोटरमनला गाडी वेळेत थांबवणे शक्य झाले. अन्यथा गाडी रूळावरून घसरण्याची दाट शक्यता होती. सध्या आरपीएफकडून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर काही ठिकाणी अशाचप्रकारे रूळावर रॉड ठेवून रेल्वेला घातपात करण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, या घटनेमागे कोणत्याही घातपाताची शक्यता नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोणीही घाबरण्याची गरज नाही कारण तो रॉड रेल्वे रूळाचा भाग नसून फक्त लोखंडी रॉड होता. येथून जवळच एका पुलाचे काम सुरू असल्याने हा रॉड रूळावर पडल्याची शक्यता आहे. मात्र, हा प्रकार नेमका कसा घडला, याचा तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.