शेतकऱ्यांच्या कष्टाला फलदायी आणि जलसाठ्यांना पाणीदार करणारा नैर्ऋत्य मोसमी पावसाचा दिलासादायक अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी जाहीर केला. दीर्घकालीन अंदाजानुसार, यंदा देशात ९८ टक्के म्हणजेच सर्वसाधारण पाऊस होणार आहे. महाराष्ट्रातील पावसाचा टक्काही सर्वसाधारण राहणार असून, मुंबईसह कोकण विभाग, विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

देशात एकूण पावसापैकी ७५ टक्के वाटा नैर्ऋत्य मोसमी पावसाचा असतो. बहुतांश कृषी व्यवस्था आणि पाण्याची उपलब्धता याच पावसावर अवलंबून असल्याने त्याबाबत प्रचंड उत्सुकता असते. अर्थव्यवस्थेवरही त्याचा थेट परिणाम होत असल्याने हवामान विभागाकडून दरवर्षी हंगामाच्या दीड महिना आधीच पहिल्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज जाहीर केले जातात. ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण समजला जातो. त्यानुसार यंदा ९८ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. करोना प्रादुर्भावाच्या या काळामध्ये या अंदाजाने काहीसा दिलासा मिळाला आहे.

हवामान विभागाने यंदाचा अंदाज स्थानशास्त्रीय पातळीवर दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातील अंदाज मे महिन्याच्या शेवटी वर्तवला जाणार असून, हंगामातील जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक टप्प्यावर अंदाज जाहीर केले जाणार आहेत. ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांत यंदा सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. उर्वरित देशात सरासरीइतका किंवा काही भागांत सरासरीपेक्षाही अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

समुद्रातील स्थितीही पोषक

देशातील मोसमी पावसावर ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ हे दोन घटक परिणाम करीत असतात. ‘ला निना’ परिणामात प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान कमी होते. त्याचा पावसावर परिणाम होत नाही. ‘एल निनो’मुळे मात्र प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढते आणि पावसाचे प्रमाण कमी होते. यंदा ‘एल निनो’ तयार होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मोसमी पावसासाठी समुद्रातील स्थितीही पोषक राहणार आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी परिसरात आतापर्यंत ३ हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापेक्षा जास्त पाऊस यंदा होईल. मराठवाडा, विदर्भाची आतापर्यंतची सरासरी ६०० मिलिमीटर इतकी कमी असली, तरी यंदा त्यापेक्षाही जास्त पाऊस होईल. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी चिंता करण्यासारखी स्थिती नाही. मध्य महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाचे कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.