10 August 2020

News Flash

वातावरणातील घडामोडींचा वेधशाळांना चकवा

मुंबईत ज्या कारणांच्या आधारे अतिवृष्टी घोषित करण्यात आली होती त्या घडामोडी प्रत्यक्षात कमी प्रमाणात घडल्याचे सरकारी व खासगी संस्थांनी स्पष्ट केले.

वातावरणातील घडामोडींचा वेधशाळांना चकवा

अतिवृष्टीचा अंदाज चुकला; केवळ शनिवारीच मुसळधार पावसाची हजेरी; सोमवारी जोर ओसरणारप्राजक्ता कासले, मुंबई

प्रत्येक क्षणाला अंदाज बदलणाऱ्या मोसमी पावसाबद्दल दहा दिवसांपूर्वीच ठाम शक्यता व्यक्त करण्याचा परिणाम सरकारी यंत्रणांसह सामान्यांना भोगावा लागला आहे. सलग तीन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा खासगी संस्थांनी दिलेला अंदाज आणि सरकारी हवामानशास्त्र विभागाने पाच दिवसांपूर्वी जारी केलेला इशारा प्रत्यक्षात केवळ शनिवारच्या मुसळधार पावसापुरता वास्तवात उतरला. मुंबईत ज्या कारणांच्या आधारे अतिवृष्टी घोषित करण्यात आली होती त्या घडामोडी प्रत्यक्षात कमी प्रमाणात घडल्याचे सरकारी व खासगी संस्थांनी स्पष्ट केले.

केरळमध्ये पावसाने प्रवेश करण्याआधीच म्हणजे २८ मे रोजी स्कायमेट या खासगी संस्थेने मुंबईत ८ ते ११ जूनदरम्यान अतिवृष्टी होऊन जलप्रलयाची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर या तारखांदरम्यान मुंबईत २६ जुलप्रमाणेच परिस्थिती होणार असल्याचे संदेश समाज माध्यमांवरून फिरू लागले. सोमवारी मुंबई हवामानशास्त्र विभागानेही ९ व १० जून  रोजी मुंबईसह उत्तर कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर मुंबईसह ठाणे, नवी मुंबई महापालिकांनी आपत्कालीन यंत्रणा सज्ज केल्या.  मात्र प्रत्यक्षात शुक्रवारी ऊन पडले होते. शनिवारी टप्प्याटप्प्याने पाऊस पडला व रविवारी पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

मुंबई हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांच्या मते अतिवृष्टीच्या या अंदाजामागे चार प्रमुख कारणे होती. पश्चिम किनारपट्टीवरील कोकणाजवळ द्रोणीय स्थिती दिसत होती. अशी स्थिती निर्माण झाल्यास बाष्पयुक्त वारे खेचले जाऊन त्या भागात जोरदार पाऊस पडतो.

केरळ ते गुजरात किनारपट्टीदरम्यान वातावरणात हवेच्या कमी दाबाचे अनेक पट्टे दिसत होते. याचदरम्यान बंगालच्या उपसागरात तयार होणारया कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीजवळील वारे जमिनीवर ओढले जाण्याची शक्यता होती. ही स्थिती तसेच वाऱ्याची दिशा व वेग यामुळे जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज पाच दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला.

स्कायमेट या संस्थेची कारणेही साधारण याचप्रकारची होती. मुंबई ते केरळदरम्यानचा कमी दाबाचा पट्टा, दक्षिण कोकण तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रावरील चक्रीवातसदृश्य स्थिती, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे येताना वाऱ्यांचा वाढणारा वेग दिसत असल्याने मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आल्याचे स्कायमेटचे योगेश पाटील म्हणाले.

काही दिवसांपूर्वीपर्यंत ही स्थिती दिसत असली तरी प्रत्यक्षात ८ जून रोजी हवेच्या दाबाच्या पट्टय़ांची तीव्रता कमी झाली होती. त्यावेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अपेक्षित वेळेआधीच तयार होऊन पूर्व किनारपट्टीकडे न वळता उत्तरेकडे सरकले होते.

त्यामुळे झारखंड, पश्चिम बंगाल व ईशान्य भारतात जोरदार पाऊस पडत असला तरी पश्चिम किनारपट्टीवरील वारे जमिनीकडे खेचले गेले नाहीत. यामुळे पावसाची तीव्रता कमी झाली, असे स्पष्टीकरण मुंबई हवामानशास्त्र विभागातील उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिले.

पावसाचा जोर कमी होणार..

आजपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. रविवारी मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी येतील व काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकणात पुढील चार दिवस पावसाची शक्यता आहे. सोमवापर्यंत राज्याच्या अंतर्गत भागातही मोसमी पाऊस पोहोचेल. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार असून पुढील आठवडय़ांत मोसमी वाऱ्यांची फारशी उत्साहवर्धक स्थिती नसल्याचे दिसत आहे. उत्तर भारतातही मोसमी पाऊस सरकण्यासाठी अनुकूल स्थिती नाही, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला.

हवामानाचा अंदाज वर्तवणारे प्रारुप आणि सद्यपरिस्थिती या दोहोंची सांगड घालून भारतीय हवामानशास्त्र विभाग शक्यता वर्तवतो. रोज सकाळी व संध्याकाळी हवामानाची बदलती स्थिती पाहून अंदाज बदलतात. मात्र केवळ मॉडेल पाहून काहीजण वैयक्तिक पातळीवर शक्यता वर्तवतात, त्यामुळे ते खरे ठरत नाहीत.

कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई हवामानशास्त्र विभाग

मुंबईत ८ ते ११ जून दरम्यान रोज १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडेल असे आम्हाला दिसत होते. मात्र ज्या चार प्रमुख घडामोडींवरून आम्ही हा अंदाज वर्तवला होता त्या फारशा सक्रीय झाल्या नाहीत.

योगेश पाटील, मुख्य अधिकारी, स्कायम्

आपल्याकडे हवामान संशोधक नाहीत. केवळ रडारवरील माहितीचे विश्लेषण होते व तेदेखील योग्य पद्धतीने होत नाही. वारंवार चुकणाऱ्या अंदाजांमुळे सरकारी यंत्रणांवर नाहक ताण येतोच. अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, शिवाय लोकांचा हवामान विभागावरील विश्वास कमी होतो.

अतुल देऊळगावकर, पर्यावरणतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2018 3:32 am

Web Title: meteorological department mumbai monsoon
Next Stories
1 पाऊस संकटाशी लढण्यासाठी ‘आपत्कालीन पथक’ सज्ज
2 लोकसत्ता लोकसंवाद
3 पावसाचा कहर; भायखळा पोलीस चौकीत पाणी भरले…
Just Now!
X