News Flash

पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस

केरळमधून दोनच दिवसांत महाराष्ट्रात दाखल झालेला मोसमी पाऊस सहा दिवसांचा प्रवास करीत राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.

कोकणासह विदर्भातही अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

मुंबई : पहिल्या दिवशी मुंबईला झोडपून काढल्यानंतर गुरुवारी मात्र मुंबईतील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला होता; मात्र तरीही रात्री ८ वाजल्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अत्यंत मुसळधार म्हणजेच २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी २०० मिमीची मर्यादा ओलांडणाऱ्या मुंबई उपनगरात गुरुवारी केवळ ४६.८ मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे केवळ १०.२ मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी येथे २.३ मिमी, रायगड येथे २.४ मिमी तर, ठाणे येथे १८.८ मिमी इतका पाऊस पडला. मुंबईत पुढील काही दिवस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा म्हणजेच १५.६ मिमी ते ६४.६ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे; मात्र काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार म्हणजेच ६४.५ मिमी ते २०४.४ मिमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगडमध्ये १२ जूनला अत्यंत मुसळधार म्हणजेच २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांत ठाणे, मुंबई, रायगड येथे झालेला पाऊस हा दीर्घकालीन अंदाजाच्या तुलनेत ६० टक्के अधिक आहे. तसेच पालघर आणि रत्नागिरी येथे झालेला पाऊस दीर्घकालीन अंदाजाच्या तुलनेत २० ते ५९ टक्के अधिक आहे. मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून मुंबईतील कमाल तापमानात कमालीची घट झाली आहे. बुधवारी सांताक्रूझ येथे २९.७ अंश सेल्सिअस तर, कुलाबा येथे २८.४ अंश सेल्सिअस इतके  कमाल तापमान नोंदवले गेले.

केरळमधून दोनच दिवसांत महाराष्ट्रात दाखल झालेला मोसमी पाऊस सहा दिवसांचा प्रवास करीत राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. गेल्या वर्षी १४ जूनला त्याने महाराष्ट्र व्यापला होता. कोकणातून तो मुंबई परिसरात दाखल होत असताना किनारपट्टीच्या भागात मोठ्या उंचीचे ढग निर्माण झाले होते. परिणामी, या भागांत अतिवृष्टीची नोंद झाली. मुंबईच्या सांताक्रुझ केंद्रावर आणि ठाण्यात चोवीस तासांत प्रत्येकी तब्बल २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या भागांत पावसाने दाणादाण उडवून देत जनजीवन विस्कळीत केले. गुरुवारीही याच भागात जोरदार पावसाची हजेरी होती. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, महाबळेश्वर, विदर्भातील अमरावती, अकोला, चंद्रपूर, गोंदिया आदी भागांतही गुरुवारी पाऊस झाला.

अंदाज काय?

कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भागांत काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वाराही वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोेल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, तर घाट क्षेत्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे.मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

कुलाब्याचे डॉप्लर रडार नादुरुस्त

१६ मे रोजी तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या जवळ आलेले असताना बंद पडलेले कुलाब्याचे डॉप्लर रडार अद्याप बंदच आहे. त्यामुळे मोसमी पाऊस सुरू झाल्यापासून रडारच्या नोंदी प्राप्त होत नसून हवामान विभागाला उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या नोंदींवरच अवलंबून राहावे लागत आहे.

मध्य महाराष्ट्रातही आजपासून जोर

पुणे : मुंबई, ठाणे परिसरात प्रवेश करताच दाणादाण उडवून दिलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने गुरुवारी (१० जून) महाराष्ट्र व्यापला. मुंबई परिसरासह कोकण विभाग आणि विदर्भातही पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी ११ जूनपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

‘रडार दुरुस्त करणे ही सोपी गोष्ट नाही. तंत्रज्ञ त्यावर काम करत आहेत. रडार कार्यान्वित नसले तरीही उपग्रहाच्या आधारे दर १५ मिनिटांनी पावसाची आकडेवारी उपलब्ध होत आहे,’ – जयंत सरकार, मुंबई प्रादेशिक केंद्र, हवामान विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:21 am

Web Title: meteorological department warning heavy rain for next 5 days akp 94
Next Stories
1 देशमुखप्रकरणी सरकारच्या याचिकेला आक्षेप
2 सह्याद्री अतिथिगृह दुरुस्तीचा अजित पवार यांचा आदेश
3 करोना मृत्यू लपवल्याचा आरोप चुकीचा!
Just Now!
X