19 October 2020

News Flash

#MeToo: नाना पाटेकर यांना अटक करा, काँग्रेसचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजीही करत कारवाईची मागणी केली आहे

नाना पाटेकर

अभिनेत्री तनुश्री दत्ता – नाना पाटेकर प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. महिला काँग्रेसने ओशिवरा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून अभिनेता नाना पाटेकर यांना अटक करण्याची मागणी केली आहे. महिला काँग्रेसने पोलिसांना चौकशी समिती नेमण्याची विनंती केली असून, यामध्ये नाना पाटेकर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजीही केली.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तिने केला आहे. बुधवारी रात्री तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तनुश्रीने तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग आणि हॉर्न ओके चित्रपटाचे निर्माते सामी सिद्धीकी यांचा समावेश आहे. तक्रार नोंदवण्यासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता बुधवारी संध्याकाळी ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली होती. तेथे येताना कोणी ओळखू नये, म्हणून तिने बुरखा परिधान केला होता.

दोन दिवसांपासून तनुश्रीचा जबाब नोंदविण्याबाबत चर्चा सुरू होती. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला नाही, तर न्यायालयात जाण्याचा इशारा तिच्या वकिलांनी दिला होता. बुधवारी रात्री उशीरा तनुश्रीच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तनुश्रीने नोंदवलेल्या जबाबानुसार, २००८ मध्ये हॉर्न ओके प्लिज चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान नाना पाटेकर यांच्यासोबत अश्लील दृश्य देण्यास सांगण्यात आले. मात्र चित्रपटाच्या मूळ करारात त्याचा उल्लेखच करण्यात आला नव्हता. तिने नकार दिल्याने कारवरही हल्ला करवला गेला, असा तनुश्रीचा आरोप आहे. तनुश्रीने यावेळी मनसेचा उल्लेख केला होता. त्यासंदर्भात तिने ‘मी टू’ मोहिमेंतर्गत सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतर हा विषय नव्याने चर्चेत आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 2:28 pm

Web Title: metoo congress demands arrest of nana patekar
Next Stories
1 पेट्रोल, डिझेल महागलं; जाणून घ्या आजचे दर
2 जीएसटी महसुलात ५६३२ कोटींची घट!
3 उपाहारगृहांना ‘आरोग्यसंहिता’ सक्तीची!
Just Now!
X