20 February 2019

News Flash

#MeToo अभिनेता पियुष मिश्रावर लैंगिक शोषणाचा आरोप

मी त्यांच्या जवळून गेले तेव्हा अचानक त्यांनी माझा हात पकडला आणि गैर वर्तन केले, असे महिलेने म्हटले आहे

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर #MeToo ही मोहीम देशातही जोर धरू लागली. याच मोहिमे अंतर्गत अनेक अभिनेत्री आणि महिला पत्रकारांनी, दिग्दर्शक आणि निर्माता पदावर असलेल्या महिलांनी लैंगिक छळ, गैरवर्तन, बलात्कार यांसारख्या अन्यायांना वाचा फोडली आहे. अभिनेता पियुष मिश्राचे नावही आता या यादीत समाविष्ट झाले आहे.

नाना पाटेकर, आलोकनाथ या अभिनेत्यांवर आरोप झाल्यानंतर आता पियुष मिश्रांवरही अशाच प्रकारचे आरोप झाले आहेत. नाना पाटेकर यांना सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (Cinttaa) ने नोटीस बजावली आहे. तर आलोकनाथ यांना फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइजने नोटीस बजावली आहे. अशात आता एका महिलेने पियुष मिश्रावरही आरोप केले आहेत.

काय आहे प्रकरण?
२०१४ मध्ये मित्रांची पार्टी होती. त्यामध्ये पियुष मिश्रांनी मला निमंत्रित केले होते. मी त्यांची फॅन होते त्यामुळे मला त्या पार्टीला जाण्यास उत्सुक होते. ठरल्याप्रमाणे मी पार्टीला गेले तिथे मी एका कोपऱ्यात उभी होते. मला पियुष मिश्रांनी पाहिले आणि जवळ बोलावले. मला पियुष मिश्रा आवडत होते त्यामुळे त्यांनी जवळ येऊन बसण्यास सांगितल्याने मला आनंद झाला. मी त्यांच्या जवळ बसले. त्यानंतर तिथे वीस ते पंचवीस लोक आले होते ज्यांच्यासमवेत चर्चा करताना हळूहळू पियुष मिश्रा यांनी माझ्यासोबत फ्लर्ट करण्यास सुरुवात केली. माझ्याकडे पाहून त्यांनी एक गाणंही म्हटलं. पियुष मिश्रा दारू पित होते. पार्टी संपताना एक एक माणूस त्यांचा निरोप घेऊ लागला. तोपर्यंत ते नशेत आकंठ बुडाले होते. मी माझ्या एका मैत्रिणीसोबत आले होते. तिच्यासोबत मला घरी जायचे असल्याने मी तिची वाट पाहू लागले. पियुष मिश्रा तेव्हा खुर्चीत बसले होते.

मी त्यांच्या जवळून गेले तेव्हा अचानक त्यांनी माझा हात पकडला आणि गैर वर्तन केले. मी पार्टी होस्टकडे पाहून इशारा केला ज्यानंतर पार्टी होस्टने मला हाक मारून बोलावले. मी जाऊ लागले तेव्हा मिश्रा यांनी पुन्हा माझा हात पकडला. मी तो सोडवून पुन्हा जाऊ लागले तेव्हा पियुष मिश्रा उठून उभे राहिले आता ते मला मिठी मारण्याच्या बेतात होते तेव्हा मी त्यांच्यावर जोरात ओरडले की तुम्ही बसून घ्या. माझा आवाज ऐकून तिथे काही लोक आले आणि त्यांनी पियुष मिश्रांना तिथून बाजूला केलं. पार्टी सुरु झाल्यापासूनच त्यांची नजर माझ्यावर होती आणि ते काहीतरी चुकीचे वागणार हे मला वाटत होते आणि तसेच घडले असेही या महिलेने म्हटले आहे.

First Published on October 11, 2018 7:46 pm

Web Title: metoo piyush mishra gets accused of inappropriate touching by female journalist