कामे रखडल्याने रस्त्यांवरही वाहतूक कोंडी

मुंबई : कामाची प्रगती समाधानकारक नसल्यामुळे ‘मेट्रो-२ बी’ मार्गिकेच्या दोन कंत्राटदारांना गेल्या वर्षी नारळ दिल्यानंतर दोन पॅकेजमधील कामे अद्यापही खोळंबली आहेत. या कामांसाठी अद्यापही नव्या कंत्राटदाराची प्रतीक्षा आहे. कंत्राटदार नसल्याने मेट्रोची कामे रखडली असून या कामासाठी उभारण्यात आलेल्या मार्गरोधकांमुळे रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होत आहे.

‘मेट्रो-२ बी’ (डी. एन. नगर ते मंडाळे) या २३.६४३ किमी मार्गिकेच्या कामास २०१८ मध्ये सुरुवात झाली असून, ऑक्टोबर २०२२ पर्यंत या मार्गावरून मेट्रो धावण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र या मार्गिकेवरील सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. आणि एमबीझेड-आरसीसी या दोन कंत्राटदारांचे काम अतिशय मंद गतीने सुरू होते. त्यामुळे त्यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नारळ देण्यात आला. त्यापैकी दोन पॅकेजमधील कामाला पुन्हा सुरुवात झालेली नाही.

‘मेट्रो-२ बी’ मार्गिका वांद्रे-कुर्ला संकुलातून जाते. येथील संपूर्ण टप्प्यात रस्त्याच्या मधोमध रस्तारोधक (बॅरिकेड) लावण्यात आले आहेत. मात्र गेल्या वर्षभरात तेथे कसलेही काम झालेले नाही. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील तेथे कामाला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे जवळपास दोन वर्षांपासून हे दुभाजक निव्वळ अडथळाच ठरत आहेत.

कंत्राटदारांना नारळ दिल्यानंतर नवीन कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली होती. मात्र त्यास आलेला प्रतिसाद हा अंदाजित निविदा रकमेपेक्षा अधिक आहे. परिणामी अधिक रकमेची निविदा मंजूर करणे कठीण असून, नवीन कंत्राटदार नेमण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘मेट्रो-२ बी’च्या २३.६४३ किमींपैकी १२.७ किमी मार्गासाठी सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीस एक हजार ८० कोटी रुपयांचे कंत्राट जानेवारी २०१८ मध्ये देण्यात आले होते. मात्र २५ महिन्यांत केवळ ५.०७ टक्के च काम झाले होते. मूळ कंत्राटदाराने के लेली दिरंगाई आणि सध्या नवीन कंत्राटदार नसल्याने गेल्या अडीच वर्षांपासून हे काम रखडले आहे. परिणामी, ऑक्टोबर २०२२ मध्ये या मार्गिके वरून मेट्रो धावण्याची शक्यता धूसर बनली आहे. दरम्यान, याच मार्गिकेवरील चेंबूर येथील काम असेच रखडल्याने तेथे दिवसभर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.