गिरगावपाठोपाठ आता दादरमधील रहिवाशांनीही ‘मेट्रो-३’ प्रकल्पाचा धसका घेतला आहे. मात्र, दादरमधील केवळ आठ भाडेकरू या प्रकल्पामुळे बाधित होणार असून त्यांचे याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अथवा पुरेसा मोबदला दिला जाईल. त्यानंतरच त्यांची जागा संपादित केली जाईल, असे स्पष्टीकरण ‘मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ (एमएमआरसीए)च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिले आहे.
दादरच्या गोखले रोड (उत्तर) येथील ‘कॉर्नर व्ह्य़ू’, ‘सुर्वे हाउस’ आणि ‘दया हाउस’ या इमारतींच्या मालकांना ‘एमएमआरसी’ने नोटीस बजावल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. भिडे म्हणाल्या की, दादर मेट्रो स्थानकासाठी एकूण केवळ आठ भाडेकरू बाधित होत आहेत. ही कुटुंबे ‘सतीश गुप्ते हाउस’ इमारतीत राहतात. इमारत जुनी आणि मोडकळीस आली आहे. अन्य मोकळी जागा या परिसरात नसल्याने स्थानकासाठी या जागेची आवश्यकता आहे. या इमारतीमधील रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. रहिवाशांचे म्हणणे ऐकून त्यांना योग्य तो मोबदला दिल्याशिवाय त्यांची जागा घेण्यात येणार नाही, असेही स्पष्ट केले.