मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जागेची चाचपणी होते आहे असं समजतं आहे. आरेमधून कारशेडची जागा कांजूरमार्गला गेल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. मेट्रो कारशेडबाबत कांजूरमार्ग येथील जागेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो ३ चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती समजते आहे.

मेट्रोचा हा प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असून यामुळे शहर व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांना सुविधा मिळणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर कारशेडची कांजूरमार्गला होणार असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर भाजपाने कडाडून टीका केली. तसंच हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने कांजूर येथील कामाला स्थगिती दिली. परवाच पार पडलेल्या अधिवेशनातही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फक्त अहंकारातून मेट्रो कारशेडची जागा ही आरेतून कांजूरमार्गला वर्ग करण्यात आली असा आरोप केला होता.

काय म्हणाले होते फडणवीस?

“विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलं पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचं काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अट्टाहास का आहे?,” असा सवालही फडणवीस यांनी केला होता. “मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम केलं जात आहे. सरकार या कामात जेवढा उशीर करेल तितकी त्या प्रकल्पाची किंमत वाढत जाणार आहे.” असंही त्यांनी म्हटलं होतं.

आता मेट्रो कारशेडसाठी बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित असलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जागेचा विचार होतो आहे अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळते आहे. न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला वेळ लागू शकतो. तोपर्यंत कारशेड उभारण्यास विलंब लागू नये म्हणून ठाकरे सरकारकडून पर्यायी जागेची चाचपणी सुरु झाल्याचं समजतं आहे.