News Flash

मेट्रो-३ चा डेपो नियोजित जागीच

मुंबईची फुफ्फुसे म्हणून ओळखला जाणारा वनक्षेत्राचा भाग ११६८७ हेक्टर एवढा प्रचंड आहे.

मेट्रो-३च्या डेपोची प्रस्तावित जागेचा नकाशा. ‘आरे’मुळे होणारा विरोध लक्षात घेता यापुढे या डेपोला परजापूर डेपो, असे संबोधले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई मेट्रो रेल महामंडळाचा निर्धार; राष्ट्रीय उद्यानाचा फक्त ०.२५ टक्के भाग बाधित

आरे वसाहतीतील मेट्रो-३च्या प्रस्तावित डेपोला विरोध करणाऱ्यांनी एकदा ही जागा बघून यायला हवी. मुंबईची फुफ्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकूण वनक्षेत्राच्या फक्त ०.२५ टक्के क्षेत्रच डेपोसाठी आवश्यक आहे. विशेष म्हणजे ही जागा मरोळ रस्ता, जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ता आणि मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता या तीन महत्त्वाच्या रस्त्यांजवळ असून तेथे याआधीच एका कंपनीचा पॉवर प्लाण्ट आणि इतर गोष्टी आहेत. त्यामुळे मेट्रोच्या डेपोमुळे पर्यावरणाचा अजिबातच ऱ्हास होणार नाही. याआधीच या जागेवरून अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. आता मेट्रो-३चा डेपो याच जागेत होणार, असा निर्धार मुंबई मेट्रोरेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.

मुंबईची फुफ्फुसे म्हणून ओळखला जाणारा वनक्षेत्राचा भाग ११६८७ हेक्टर एवढा प्रचंड आहे. या मोठय़ा भागात एकूण दहा गावे असून मेट्रो-३च्या डेपोसाठीची प्रस्तावित जागा परजापूर गावात आहे. म्हणजे ही जागा आरे गावातही नाही. या डेपोसाठी याआधी ३० हेक्टर जागा निश्चित करण्यात आली होती. पण पाच हेक्टर जागेत असलेल्या वृक्षसंपदेचा विचार करून ही पाच हेक्टर जागा वगळण्यात आली आहे. आता डेपोसाठी फक्त २५ हेक्टर जागेचाच वापर होणार असल्याचे भिडे यांनी सांगितले.

आरे वसाहतीचे क्षेत्र १२८७ हेक्टर एवढे प्रचंड असून डेपोसाठी लागणारी जागा या क्षेत्राच्या २.३३ टक्के आणि एकूण वनक्षेत्राच्या फक्त ०.२५ टक्के एवढेच आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच आरे डेपोला त्याच्या नावातील ‘आरे’मुळे होणारा विरोध लक्षात घेता यापुढे या डेपोला परजापूर डेपो, असेच म्हणण्याचा विचार चालू असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.

मुंबईकर ज्या भागाला आरे कॉलनी असे ओळखतात त्यात साई आणि गुंडगाव, चित्रनगरी, रॉयल पाम्स, िदडोशी-एक्सर पहाड, आरे, पहाडी गोरेगाव, वैरावळ, कोंडिविता, मरोशी, परजापूर आणि पासपोळी एवढी गावे येतात. त्यातील परजापूर गावात हा नियोजित डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो उभारताना भूजलसाठय़ाचा  विचार करून मेट्रो उभ्या राहण्याच्या मार्गावर छप्पर उभारणेही टाळण्यात येणार आहे. तसेच शक्य होईल त्या जागेत सौरपटल बसवून सौर ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न होणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले.

सत्यासत्यता पडताळावी

मुंबई मेट्रोरेल महामंडळ पर्यावरणाचा अत्यंत बारकाईने विचार करीत आहे, पण काही ठिकाणी झाडे तोडणे अनिवार्य आहे. तुटलेल्या प्रत्येक झाडामागे मेट्रो तीन झाडे लावणार आहे. तशा सूचनाही कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. निविदेत या बाबी नमूद करण्यात आल्या होत्या. झाडे वाचवली पाहिजेत, याबाबत  दुमत नाही. लोकांनी विरोध करण्याबाबत आमचे काहीच मत नाही, पण विरोध करताना सर्व सत्यासत्यता पडताळून पाहण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:34 am

Web Title: metro 3 depot land issue
Next Stories
1 वर्षभरात अवघ्या अडीच हजार नव्या घरांची विक्री
2 पेंग्विन दर्शनाचा आनंद मिळायलाच हवा!
3 मुंबई बडी बांका : ते ‘राष्ट्रद्रोही’?
Just Now!
X