कुलाबा ते सिप्झ अंधेरीदरम्यान धावणाऱ्या ‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी पालिकेची जागा कायमस्वरूपी देण्यास शिवसेनेने विरोध केला असताना भाजपने विरोधकांशी हातमिळवणी करीत मंजूर केलेला प्रस्ताव पुन्हा बैठकीत मांडण्याची धडपड शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र सुधार समिती अध्यक्षांनी शिवसेनेचे मनसुबे हाणून पाडल्याने शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, आता पालिका सभागृहात या प्रस्तावावरून शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत.

‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी मुंबईमधील पालिकेचे १७ भूखंड कायमस्वरूपी देण्यात येणार असून त्यामध्ये हुतात्मा चौक, ईरॉस सिनेमा, मंत्रालय मार्ग, प्रकाश पेठ मार्ग, भाटिया बाग आदींचा समावेश आहे. या भूखंडापोटी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडून (एमएमआरसी) २८७.५१ कोटी रुपये पालिकेला देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने काही दिवसांपूर्वी सुधार समितीमध्ये सादर केला होता. या प्रस्तावाला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. मात्र भाजपने विरोधी पक्षाला हाताशी धरून हा प्रस्ताव मंजूर करून टाकला.

या प्रकारामुळे शिवसेना नगरसेवक संतप्त झाले आहेत. सुधार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव पुन्हा आणून तो रद्द करण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू झाल्या आहेत. हा प्रस्ताव पुन्हा बैठकीत मांडण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र माजी महापौर शुभा राऊळ यांनी सादर केले होते. मात्र या पत्राला साधे उत्तरही देण्यात आलेले नाही. त्यामुळे शुभा राऊळ यांनी सुधार समितीच्या सोमवारच्या बैठकीत या प्रश्नाला वाचा फोडली. मात्र सुधार समिती अध्यक्षांनी बैठक तहकूब करून शिवसेनेच्या विरोधातील हवाच काढून टाकली.

सुधार समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावाला पालिका सभागृहाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यामुळे लवकरच हा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. शिवसेनेने संख्याबळाच्या जोरावर हा प्रस्ताव नामंजूर केल्यास भाजपवर नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. मात्र या प्रस्तावाच्या निमित्ताने सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेना आणि भाजपमधील वाद चव्हाटय़ावर येण्याची चिन्हे आहेत.