‘मेट्रो-३’च्या धडकेत घर गमवावे लागणाऱ्या गिरगावकरांचा आता काँग्रेसलाही कळवळा आला असून ‘मेट्रो-३’च्या विरोधात शिवसेनेने बुधवारी पुकारलेल्या ‘गिरगाव बंद’मध्ये काँग्रेसनेही उडी घेतली आहे. गिरगावकरांनी बंदला चांगला प्रतिसाद दिला असून चिराबाजार, गिरगाव, ग्रॅण्ट रोड रहिवासी बचाव कृती समिती, स्थानिक व्यापारी व गणेशोत्सव मंडळांनीही पाठिंबा दिला आहे. स्थानिकांनी आधी पुनर्वसन, नंतरच प्रकल्प असे ठणकावत सायंकाळपर्यंत गिरगाव बंदची हाक दिली गेली आहे. 
नवी दिल्लीमध्ये भुयारी मेट्रो रेल्वे उभारण्यात आली असून या प्रकल्पासाठी एकही घर पाडावे लागले नाही. पण गिरगावातील रहिवाशांची घरे उद्ध्वस्त करून ‘मेट्रो-३’ प्रकल्प राबविण्याचा घाट घालण्यात आला आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही. गिरगावकरांचे तेथेच पुनर्वसन करावे अथवा ‘मेट्रो-३’ अन्य मार्गाने वळवावी. गिरगावकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने शिवसेनेने बुधवारी पुकारलेल्या ‘गिरगाव बंद’मध्ये काँग्रेसही सहभागी होईल, असे मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.
‘मेट्रो-३’च्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्ष संपदेवर घाला घालण्यात येणार आहे. वृक्ष संपदा जपण्याची गरज आहे. त्यामुळे आरे कॉलनीऐवजी जवळच उपलब्ध असलेल्या केंद्र सरकारच्या मोकळ्या जागेवर ही कारशेड उभारावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे केंद्र गुजरातमध्ये हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जावे आणि पंतप्रधानांपुढे महाराष्ट्राची बाजू मांडावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.