मुंबई : उपनगरीय रेल्वेसेवा (लोकल) मर्यादित स्वरूपात सर्वांसाठी खुली केल्यानंतर मेट्रोच्या वेळांमध्येदेखील वाढ करण्यात आली आहे. घाटकोपर ते वर्सोवा या मार्गिकेवर १ फेब्रुवारीपासून सकाळच्या वेळी ही सेवा एक तास लवकर सुरू होईल, त्यामुळे दिवसभरातील फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.
सोमवारपासून वर्सोवा येथून घाटकोपरसाठी पहिली मेट्रोगाडी सकाळी ६.५०, तर घाटकोपरहून वर्सोवासाठी पहिली गाडी सकाळी ७.१५ वाजता सुटेल. दोन्ही ठिकाणच्या शेवटच्या गाडीच्या वेळांमध्ये १२ दिवसांपूर्वीच बदल करण्यात आला असून, सोमवारपासून त्यामध्ये काहीही बदल केलेला नाही. त्यानुसार वर्सोवाहून शेवटची गाडी रात्री ९.५० ला, तर घाटकोपरहून १०.१५ ला सुटेल. सध्या सरासरी सहा ते आठ मिनिटांच्या वारंवारितेने मेट्रोच्या फेऱ्या सुरू आहेत.
प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रो स्थानकात येण्या-जाण्यासाठी मर्यादित दारेच खुली ठेवण्यात आली होती. त्यामध्येदेखील बदल करण्यात येत असून अंधेरी आणि घाटकोपर रेल्वे स्थानक ते मेट्रो स्थानक असा रेल्वे पादचारी पुलाचा मार्ग एक फेब्रुवारीपासून खुला होईल. तसेच अंधेरी मेट्रो स्थानकावरून अंधेरी पश्चिमेस जाणारा मार्गदेखील उपलब्ध असेल. यापूर्वी साकीनाका, मरोळ नाका, चकाला आणि पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकांवरील दोन्ही बाजूंची प्रवेशद्वारे खुली करण्यात आली आहेत.
मेट्रो १ वर सध्या दिवसाला २३० फेऱ्या होत आहेत. टाळेबंदी लागू केल्यापासून सात महिन्यांनतर १९ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू झाली असून, गेल्या चार महिन्यांत प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. सध्या दिवसाला सुमारे ८० हजार प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 12:39 am