घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्गावरील सुमारे २५,००० प्रवाशांकडून ‘स्कीप क्यू’ तिकीट प्रणालीचा वापर

मुंबई : घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो-१ मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ऑनलाइन मोबाइल तिकिट प्रणालीला पसंती दिली आहे. दीड महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘स्कीप क्यू’ या तिकीटप्रणालीचा वापर सुमारे २५,००० प्रवासी करीत आहेत. टोकन तिकीट आणि मासिक पास काढणाऱ्या प्रवाशांपैकी ६ टक्के प्रवाशांनी ‘स्कीप क्यू’ प्रणालीचा अवलंब केल्याची माहिती मेट्रो-१ प्रशासनाने दिली आहे.  यामधील ७० टक्के प्रवासी ‘पेटीएम’द्वारे तिकीट दर भरून प्रवास करीत आहेत.

मुख्य म्हणजे या मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यावर उतारा म्हणून मेट्रोला आणखी दोन डब्बे जोडण्यासंदर्भातील विचारणा ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए)‘मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड’कडे (एमएमओपीएल) केली आहे.

गेल्या काही वर्षांत घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो-१ मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकासह पश्चिम द्रुतगती मार्ग आणि अंधेरी रेल्वे स्थानकाला मेट्रो-१ ची मार्गिका जोडते. त्यामुळे वर्षांगणिक या मार्गावर प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. या मार्गिकेवरून दररोज सुमारे ३ लाख ४० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. २०१७-१८ या कालावधीत या मार्गिकेवरील प्रवासी संख्येमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली असून येत्या काही दिवसांमध्ये प्रवासी संख्या चार लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचा सोयीसाठी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मेट्रो-१ प्रशासनातर्फे ‘स्क्रीप क्यू’ या ऑनलाइन मोबाइल तिकीटप्रणालीचा प्रारंभ करण्यात आला होता. केवळ दिवसभराचे तिकीट काढण्याची सोय यामध्ये असल्याने सुरुवातीचा काळात या प्रणालीला प्रवाशांचा थंड प्रतिसाद मिळाला. मात्र जून महिन्यामध्ये या प्रणालीत मासिक पासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर टोकन आणि मासिक पास वापरणारे अनेक प्रवासी याकडे वळले आहेत.

मेट्रो-१ प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सुरुवातीच्या काळात केवळ ३,५०० प्रवासी या प्रणालीचा वापर करून मोबाइल तिकीट मिळवीत होते. मात्र आता सुमारे २५,००० प्रवासी याचा वापर करीत असून पूर्वी टोकन तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांपैकी १० टक्के प्रवासी या प्रणालीचा वापर करीत आहेत. या १० टक्क्यांपैकी ८० टक्के प्रवासी हे ‘पेटीएम’द्वारे तिकिटाचे पैसे भरीत आहेत. तसेच रेल्वेच्या ‘स्माट कार्ड’च्या धर्तीवर येत्या ६ ऑगस्टपासून ‘स्टोर व्हॅल्यू पास’ची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याद्वारे कार्डमध्ये आगाऊ स्वरूपात पैसे भरून तिकीट काढल्यानंतर त्यामधून पैसे कमी होणार आहेत. भारतात प्रथमच मेट्रोसाठी मोबाइल तिकीटप्रणाली कार्यरत करण्यात आली असून तिकिटांच्या सर्व पर्यायासाठी ‘पेटीएम’द्वारे पैसे भरता येणार असल्याचे मेट्रो-१ च्या प्रवक्त्यांनी सांगितले.

डब्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात विचारणा

या मार्गावर वाढती गर्दी लक्षात घेता मेट्रोच्या डब्यांमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.  प्रवाशांच्या या मागणीला विचारता घेता ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने या संदर्भात पाऊल उचलले आहे. ‘एमएमओपीएल’सोबत झालेल्या करारानुसार त्यांनी डब्यांच्या संख्येत वाढ करणे आवश्यक असून डब्यांची संख्या चार वरून सहा करण्यासंदर्भात त्यांना विचारणा केल्याची माहिती ‘एमएमआरडीए’मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र वाढत्या गर्दीवर मात करण्यासाठी ‘एमएमओपीएल’ प्रशासनाने मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या मार्गिकेवर आठवडय़ाच्या दिवसांमध्ये मेट्रोच्या दररोज ३७८ ते ३८२ फेऱ्या होतात. मात्र या महिन्यात त्यामध्ये वाढ करण्यात असून ३८६ फेऱ्या मारल्या जात आहेत.