महिनाभरानंतर मार्गिकेवर धावण्याची चाचणी

मुंबई : स्वयंचलित आणि स्वदेशी बनावटीच्या पहिल्या मेट्रोगाडीची चाचणीपूर्व चाचणी गुरुवारी चारकोप डेपोमध्ये घेण्यात आली. या यशस्वी चाचणीनंतर पुढील महिनाभरात विविध उपप्रणालींची चाचणी करून मग प्रत्यक्ष मार्गिकेवर पहिल्या मेट्रो गाडीची चाचणी करण्यात येणार आहे.

स्वयंचलित आणि स्वदेशी बनावटीची पहिली मेट्रो गाडी गेल्या महिन्यात मुंबईत दाखल झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जानेवारीला चारकोप डेपोमध्ये या गाडीचे अनावरण केले. मेट्रो २ ए (डीएन नगर ते दहिसर) आणि मेट्रो ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या मार्गिका या वर्षी जूनमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ९६ मेट्रोगाड्यांची बांधणी बंगळूरु येथील भारत अर्थ मुव्हर्स लि. (बीईएमएल) करत आहे.

अनावरणानंतर बीईएमएलच्या अभियंत्यांनी चारकोप येथील डेपोमध्ये सर्व डब्यांची तपासणी केली. तसेच मर्यादित हालचालींसाठी हार्ड-वायर्ड कमांडचा वापर करून सहा डब्यांच्या गाडीचे तीन-तीन डब्यांमध्ये विभाजन केले. त्याच वेळी पेंटोग्राफ कंट्रोल्स, प्रोपल्शन आणि ब्रेक यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. या तीन-तीन डब्यांची स्वतंत्रपणे चाचणी १६ आणि १७ फेब्रुवारीस डेपोमध्येच घेण्यात आली. या चाचण्या झाल्यानंतर चारकोप डेपोमध्ये सर्व सहा डब्यांच्या मेट्रोगाडीची ५२० मीटर अंतराची चाचणी २५ फेब्रुवारीला बुधवारी घेण्यात आली. मुख्य मार्गिके वरील चाचणीपूर्व चाचणी आगारात यशस्वी झाली असून आता विविध उपप्रणालींच्या चाचण्या सुरू केल्या जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यामध्ये वाहन नियंत्रण सर्किट, उच्च विद्युत दाबाचे ब्रेक, दरवाजांचे चलनवलन, दिवे, उद््घोषणा यंत्रणा, प्रवासी माहिती यंत्रणा आणि साहाय्यक ऊर्जा पुरवठा या बाबींचा समावेश आहे. यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुसरी मेट्रोगाडी मार्चमध्ये

मार्चमध्ये दुसरी मेट्रोगाडीदेखील चारकोप डेपोमध्ये दाखल होणार आहे. डेपोची मुख्य मार्गाला जोडणी आणि मार्गिकेवरील इतर कामे पूर्ण करून प्रत्यक्ष मार्गिकेवर महिनाभरानंतर मेट्रो रेल्वेगाडीची चाचणी घेतली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सहा डब्यांची एक मेट्रो रेल्वेगाडी याप्रमाणे ८४ गाड्यांची बांधणी सध्या सुरू आहे. तसेच मेट्रो ७ मार्गिकेच्या विस्तारीत मार्गासाठी (१३.५ किमी) आणखी १२ मेट्रो रेल्वेगाड्यांची वाढ त्यामध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या सहा रेल्वे गाड्या सहा महिन्यांत दाखल होणार असून, दर महिन्याला तीन याप्रमाणे उर्वरित गाड्या पुढील तीन वर्षांत येतील.

टाळेबंदीमुळे विलंब

मेट्रो रेल्वेगाडीच्या प्रारूपाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये केले होते. त्यानंतर पहिली गाडी जून २०२० मध्ये मुंबईत दाखल होणे आणि दोन्ही मार्गिका डिसेंबर २०२० अखेर सुरू होणे अपेक्षित होते. मात्र टाळेबंदीमुळे सर्व प्रक्रियेस सहा महिन्यांचा विलंब झाला.