मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनेक मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम शनिवारी मुंबईमध्ये पार पडला. वांद्रे-कुर्ला संकुलातील कन्व्हेन्शन सेंटर येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्ग १०, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्ग ११ आणि कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग १२ या तीन नवीन मार्गाचे भूमिपूजन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मात्र यावेळी मोदींच्या हस्ते अनावरण झालेल्या प्रकल्प शिळेवर मराठीला डावलण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

शनिवारी पार पडलेल्या या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोच्या प्रकल्प शिळेचे अनावरण करण्यात आले. मात्र त्या प्रकल्प शिळेवरील सर्व मजकूर हा हिंदी भाषेत आहे. याच प्रकल्प शिळा अनावरण सोहळ्याचा फोटो देशपांडे यांनी ट्विट केला आहे. या फोटोमध्ये मेट्रोच्या शिळेवरील हिंदी भाषेतील मजकूर दिसत असून मोदी त्या प्रकल्प शिळेचे अनावरण करताना दिसत असून प्रकल्प शिळेच्या दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री उभे असलेले दिसत आहे. महाराष्ट्रातील राज्य कारभाराची प्रमुख भाषा असणाऱ्या मराठीला डावलण्यात आल्याचा आरोप देशपांडे यांनी ट्विटवरुन केला आहे. ‘आज उघड करण्यात आलेल्या मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर मराठी (भाषा) नाही. काहीही संबंध नसताना बाहेरची असलेली हिंदी (भाषा) मात्र आहे. महाराष्ट्राची हिंदी भाषेकडे वाटचाल होत आहे. राज्य शासनाचा निषेध’ असे ट्विट देशपांडे यांनी केले आहे.

दरम्यान या ट्विटलाच कुणाल जोशी या फॉलोअरने केलेल्या रिप्लायमध्ये ‘मेट्रोच्या कारभारामध्ये मराठीचाच वापर झाला पाहिजे अशी माहिती राज्य शासनाने एका माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात दिली होती,’ यासंदर्भातील कागदपत्रांचा फोटो ट्विट केला आहे.

या ट्विटबरोबरच अनेकांनी सध्या अंधेरी ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रोमध्येही मराठी भाषेला दुय्यम वागणुक दिली जात असल्याचा आरोप केला आहे.

अनेकांनी परराज्यातील मेट्रो स्थानकांमध्ये कशाप्रकारे स्थानिक भाषेला महत्व दिले जाते याचा फोटोंसहीत दाखला दिला आहे. त्यामुळे आता यावर सरकार काय उत्तर देते किंवा मनसे यासंदर्भात काही कायदेशीर पावले उचलणार का हे येणाऱ्या काळात समोर येईल.