चकाला, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जलमय होण्याची शक्यता; पर्यावरण तज्ज्ञांचा अहवाल

आरे कॉलनी येथे मेट्रो-३ प्रकल्पासाठी कारशेड झाल्यास येथील मिठी नदीचे पाणी पावसाळ्यात चकाला परिसर, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे घुसून पूरस्थिती निर्माण होईल. असा गंभीर उल्लेख कारशेडची जागा निवडण्यासाठी नेमलेल्या शासकीय समितीतील दोन पर्यावरणतज्ज्ञांनी त्यांच्या अहवालात केला आहे. माहिती अधिकारात माहिती मागवून ही बाब पुढे आली असून या आक्षेपासह अनेक गंभीर आक्षेप या तज्ज्ञांनी घेतले आहेत. तरी देखील शासनाने येथे कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्याने पर्यावरणतज्ज्ञांच्या मतास शासनाने केराची टोपली दाखवली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते झोरु बाथेना यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत मेट्रो-३ प्रकल्पाबाबत ही धक्कादायक माहिती समोर आली. जून २०१५ मध्ये मेट्रो-३ मार्गासाठी ‘डेपो सिलेक्शन असेसमेंट’ हा कारशेडची जागा निवडण्यासाठीचा अहवाल तयार करण्यात आला होता. हाच अहवाल बाथेना यांनी माहिती अधिकारातून मागविला.

हा अहवाल तयार करण्यासाठी शासनाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान, दिल्ली मेट्रोचे संचालक एस.डी. शर्मा या बडय़ा अधिकाऱ्यांसह पर्यावरणतज्ज्ञ म्हणून आयआयटी मुंबईचे प्राध्यापक श्याम असोलेकर आणि ‘निरी’चे संचालक राकेश कुमार आदी सहा सदस्यांची नियुक्ती केली होती. या समितीने मेट्रो-३ प्रकल्पासाठी कारशेड उभी करण्याकरिता बॅकबे रिक्लमेशन-कुलाबा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, महालक्ष्मी रेसकोर्स, धारावी, वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स, मुंबई विद्यापीठ-कलिना, आरे कॉलनी, सारीपुतनगर, कांजूरमार्ग येथील एकूण ९ जागांची पाहणी केली होती. अंतिमत या समितीने आर कॉलनी येथील जागेला हिरवा कंदील दिला होता. मात्र, या समितीतील प्रा. श्याम असोलेकर आणि ‘निरी’चे संचालक राकेश कुमार या दोघांनी या निर्णयाच्या विरोधात आपले मत व्यक्त केले होते. तसेच, अहवालावर सही करताना आम्ही निर्णयाशी सहमत नसल्याचे या दोघांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्याची कोणतीही दखल न घेता हा निर्णय घेण्यात आल्याने पर्यावरणतज्ज्ञांना समितीवर नेमण्याचा फार्स केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते झोरु बाथेना यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना विचारले असता त्यांनी ही समिती शासनाने नेमली असल्याने त्यांच्याकडूनच याबाबतची माहिती मिळू शकेल असे स्पष्ट केले.

आक्षेप

१. कारशेडची प्रस्तावित जागा ही मिठी नदीच्या पात्रानजीक असून या जागेत कारशेड बांधल्यास पावसाळ्यात पाणी रोखून धरण्याची या जागेची क्षमता निघून जाईल. काँक्रिटीकरणामुळे या जागेत पाण्याचा पूर्वीसारखा निचरा न होता ते थेट मिठी नदीकडे जाईल. मिठी नदीकडे पावसाळ्यात आलेल्या या जास्तीच्या पाण्यामुळे चकाला आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पावसाळ्यात पाणी शिरून पुरस्थिती निर्माण होईल.

२. आरे कॉलनी हे वन्यजीवांचा विशेषत बिबटय़ांचा नैसर्गिक आधिवास असून त्यांचा आधिवास नाहीसा होईल.

३. आरे कॉलनी पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील असल्याने येथील जैवविविधता आणि हरितपट्टा धोक्यात येईल.

४. जर येथे कारशेड उभारली तर येथील कापलेली झाडे दहा पटीने पुन्हा लावली तरी त्यातील ९५ टक्के झाडे देखील पुन्हा जगतील का याची शंका आहे. यामुळे सरकार, एमएमआरडीए, महानगरपालिका यांच्याबद्दल वाईट संदेश नागरिकांत जाईल.

५. कांजूरमार्ग येथील जागा व बॅकबे रेक्लमेशन येथील जागा या कारशेडसाठी योग्य असून त्यांच्या उपयोगितेबद्दल पुन्हा संशोधन होणे आवश्यक.