‘प्रभाग’फेरी – पी दक्षिण वॉर्ड

अंतर्गत भाग :  गोरेगाव, आरे कॉलनी, पांडुरंग वाडी, ओशिवरा.

छोटा काश्मीर, आरे डेअरी यामुळे परिचित असलेला हिरवागार पी दक्षिण वॉर्ड सध्या गाजतो आहे ते आरेमध्ये प्रस्तावित असलेल्या मेट्रो कारशेडमुळे. एकीकडे आरे बचावाचा नारा देत शेकडो कार्यकत्रे रस्त्यावर उतरले आहेत, तर कारशेड ‘वही बनायेंगे’ म्हणत सरकार इरेला पेटलेय. त्यातच आरेसंबंधी निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांऐवजी महानगरपालिकेकडे अधिकार देण्याचे केंद्राकडून घोषित करण्यात आल्यानंतर आरेचा प्रश्नही पालिकेच्या अखत्यारीत जमा झाला आहे. अर्थात गोरेगाव उपनगराचे प्रश्न फक्त आरेपुरते मर्यादित नाहीत.

कोणे एकेकाळी मुंबईच्या वेशीबाहेर असलेले हे गाव मुख्य शहराचा भाग झालेय. समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचा प्रभाव असलेल्या या मराठमोळ्या वस्तीला आता महानगरीचे रूप आले आणि त्यात या भागाचा सांस्कृतिक चेहराही बदलतो आहे.

गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्गानजीक आयटी पार्क आहे. दोन्ही बाजूला उभ्या राहिलेल्या उंच इमारती आणि मॉल्स तसेच आलिशान हॉटेल यामुळे मराठमोळ्या गोरेगावचा चेहरा वेगाने बदलतो आहे; मात्र या वाढलेल्या लोकसंख्येसाठी नागरी सुविधा मात्र अपुऱ्या पडत आहेत. रस्ते हे त्यापकी प्रमुख.

मृणाल गोरे उड्डाणपुलामुळे गोरेगाव पूर्व आणि पश्चिम असे जोडले गेले आहेत, तसेच पश्चिम द्रुतगती मार्गाचे रुंदीकरणही झाले आहे; मात्र वाढत्या वाहनांना सामावून घेताना रस्ते अरुंद होत आहेत. गोरेगाव पश्चिमेला वाहतूक कोंडी हीच प्रमुख समस्या आहे.

प्रभागांच्या समस्या

आरेचे संरक्षण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सुरक्षा कवच म्हणून आरेला पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा दर्जा नुकताच देण्यात आला; पण आरेच्या संरक्षणासाठीच प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. मुंबईतील अपुरी जागा पाहता आरे क्षेत्र विकासासाठी खुले करण्याशिवाय गत्यंतर नाही, असा प्रशासनाचा दृष्टिकोन आहे. शिवाय आरेमध्ये केंद्रीय तसेच राज्य सरकारच्या अनेक वास्तू उभ्या आहेत. वस्ती मोठय़ा प्रमाणात उभी आहे. त्यामुळे आरेमध्ये केवळ मेट्रो कारशेडला विरोध का, असाही प्रश्न आहे. पण आधीच अध्र्या अधिक उद्ध्वस्त झालेल्या आरेला वाचविण्याऐवजी आणखी गोत्यात का आणायचे, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी विचारत आहेत. आरेबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या समितीचे अध्यक्ष पण मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त वा अतिरिक्त आयुक्तांकडे असेल, असे केंद्रीय अधिसूचनेत नमूद असल्याने हा मुद्दाही पालिकेच्या परिघात आला आहे.

रुग्णालय की दवाखाना? 

गोरेगाव पूर्वेला महानगरपालिकेचे सिद्धार्थ रुग्णालय आहे; मात्र या रुग्णालयात दवाखान्यापेक्षा जास्त सेवा आहेत, असे म्हणायला जीभ धजावत नाही. खासगी नìसग होमची संख्या जास्त आहेत. मोठय़ा रुग्णालयासाठी मात्र वांद्रे भाभा वा मग केईएम, नायर गाठण्याशिवाय पर्याय नाही. कूपर रुग्णालय पुढील दोन वर्षांत पूर्ण गतीने सुरू झाल्यास एक चांगला पर्याय उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

वाहतूक कोंडी

गोरेगावमधील वाहतूक कोंडी ही गेल्या पाच वर्षांत अधिक वाढली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गानजीक आयटी पार्क तसेच अनेक आलिशान हॉटेल, रहिवासी इमारतींचे बांधकाम झाले. या सर्व उच्चभ्रूंच्या गाडय़ा द्रुतगती मार्गावर येऊ लागल्याने या भागात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडून पूर्व दिशेला येत असलेल्या वाहतुकीलाही अडथळे येत आहेत. गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंचे रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीची समस्या जाणवते. गोरेगाव पश्चिमेला एसव्ही रोड आणि लिकिंग रोड तर आधीपासूनच वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहेत.

फेरीवाले आणि अतिक्रमण

फेरीवाल्यांवर अधूनमधून कारवाई होत असली तरी त्यांना मिळत असलेल्या राजकीय पािठब्यामुळे गोरेगाव स्थानक, ओशिवऱ्याचा परिसरात फेरीवाले कायम आहेत. त्यातच ओशिवरा येथे पदपथावर फíनचरची दुकाने आहेत. या दुकानांनी पदपथासोबत रस्त्यापर्यंत बस्तान बसवले असून या दुकानांमुळे घाण तर होतेच शिवाय रस्त्यावर गाडी चालवणेही कठीण होते.

कचराकुंडय़ांची मागणी

दक्षिण आणि मध्य मुंबईतील कचरा वर्गीकरणाचा विषय गोरेगावात केवळ वेगळ्या कुंडय़ा पोहोचवण्यापुरताच पोहोचलाय. निवासी इमारतींप्रमाणेच गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेच्या लहान दुकानदारांना तसेच औद्योगिक वसाहतींमध्येही कचराकुंडय़ा पुरवण्याची मागणी होत आहे. गटार आणि ओशिवरा नदीत कचरा होण्याबाबत, मात्र पालिकेसोबत स्थानिकांना आणि त्यांच्या मानसिकतेलाही दोषी धरता येईल. ओशिवरा नदीत आलेल्या पुराने दहा वर्षांपूर्वी गोरेगावची वाताहत झाली होती.

सेनेचा वरचष्मा

गोरेगावच्या ओशिवरा आणि पश्चिम द्रुतगती मार्गालगतच्या उंच इमारतींमुळे हा परिसर महानगर होत असला तरी मूळचे  गोरेगाव म्हणजे मराठी लोकवस्तीचा भाग. ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचा ठसा गोरेगावच्या सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीवर उमटला. त्यानंतर हा भाग शिवसेनेने ताब्यात घेतला. सध्या या विभागातील आठपकी सहा नगरसेवक शिवसेनेचे आहेत; पण दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मतांबाबत शिवसेनेवर मात केल्याने या वेळच्या पालिका निवडणुकांची रंगत वाढली आहे.

आदिवासी पाडय़ांचा विकास

शहरात असूनही शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या आरेतील पाडय़ांचा विकास ही आणखी एक जटिल समस्या आहे. अजूनही अनेक पाडय़ांमध्ये वीज पोहोचलेली नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट आहे. शाळेत जाण्यासाठी मुले अजूनही डोंगर ओलांडून जातात. आरोग्यसेवेबाबतचे हाल आणखीनच वाईट. पण हे सर्व करण्यात अडचण आहे, ती प्रचंड वाढलेल्या अतिक्रमणाची. आदिवासींच्या घराशेजारी दहापटीने घरे वाढली आहेत.

सध्याचे नगरसेवक

* प्रभाग- ४५

नगरसेवक – स्नेहा झगडे

* प्रभाग- ४६

नगरसेवक – वर्षां टेंबवलकर

* प्रभाग- ४७

नगरसेवक – जीतेंद्र वळवी

* प्रभाग- ४८

नगरसेवक – सुनील प्रभु

* प्रभाग- ४९

नगरसेवक – लोचना चव्हाण

* प्रभाग- ५०

नगरसेवक- राजन पाध्ये

* प्रभाग- ५१

नगरसेवक – प्रमिला शिंदे

* प्रभाग- ५२

नगरसेवक –  किरण पटेल

 

फेररचनेनंतरची प्रभाग रचना 

*  प्रभाग ५०

लोकसंख्या – ५६,२३१

आरक्षण – खुला

प्रभागक्षेत्र – सुंदर नगर, महेश नगर, उद्योग नगर, राम नगर

*  प्रभाग ५१

लोकसंख्या – ४५,८१४

आरक्षण – खुला

प्रभागक्षेत्र – जयप्रकाश नगर, हनुमान टेकडी, पहाडी स्कूल, विरानी औद्योगिक वसाहत

*  प्रभाग ५२

लोकसंख्या – ४७,७९३

आरक्षण – महिला मागासवर्ग प्रभागक्षेत्र – यशोधाम विद्यालय, गोकुळ धाम, माळीनगर, रामनगर.

*  प्रभाग ५३

लोकसंख्या- ४७,०३९

आरक्षण- महिला अनु. जाती

प्रभाग क्षेत्र – आरे कॉलनी, चित्रनगरी, रॉयल पाम, आरे डेअरी, एसआरपीए.

*  प्रभाग ५४

लोकसंख्या – ४५,८४५

आरक्षण – महिला सर्वसाधारण

प्रभाग क्षेत्र – पांडुरंग वाडी, सोनावाला इंडस्ट्री, कामा इंडस्ट्री, चुरीवाडी

*  प्रभाग ५५

लोकसंख्या – ५४,३१९

आरक्षण – मागासवर्ग

प्रभागक्षेत्र – जवाहर नगर, मीठा नगर, उन्नत नगर, पिरामल नगर, श्रीनगर, टिळक नगर, सिद्धार्थ नगर

*  प्रभाग ५६

लोकसंख्या – ५७,०८३

आरक्षण – महिला सर्वसाधारण प्रभाग क्षेत्र – मोतीलाल नगर २, ३, जिजामाता नगर, नूतन विद्या मंदिर

*  प्रभाग ५७

लोकसंख्या –  ५७,४७७

आरक्षण – महिला सर्वसाधारण प्रभाग क्षेत्र – बांगूर नगर, भगतसिंग नगर,

*  प्रभाग ५८

लोकसंख्या – ५६,१८९

आरक्षण – खुला

प्रभागक्षेत्र – ओशिवरा बस आगार, गोरेगाव बस आगार, बेस्ट नगर, मोतीलाल नगर १, सिद्धार्थ नगर.