विद्यार्थी-शिक्षकांत भीतीचे वातावरण; खोदकाम थांबवण्यास मेट्रो प्रशासनाचा नकार

कुलाबा ते सीप्झदरम्यान उभारण्यात येणाऱ्या भुयारी मेट्रोच्या (मेट्रो-३) खोदकामामुळे हुतात्मा चौकातील १२६ वर्षे जुन्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इमारतीतील भिंतींना तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. सततच्या खोदकामामुळे इमारतीला हादरे बसू लागल्याने महाविद्यालयाने हे काम बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, मेट्रो प्रशासनाने ती फेटाळून लावली. त्यामुळे आता महाविद्यालय प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ च्या हुतात्मा चौक स्थानकासाठी डी.एन. रोडवर २५ मेपासून खोदकामाला सुरुवात झाली आहे. मेट्रो-३ ची संपूर्ण मार्गिका भुयारी असल्याने या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खोदकाम केले जात आहे. मात्र यामुळे डी.एन.रोडवरील १०० वर्षांहून अधिक जुन्या आणि मुख्य म्हणजे वारसा दर्जाच्या इमारतींना दिवसेंदिवस धोका निर्माण होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इमारतीला तडे गेल्याचे समोर आले आहे. तसेच खोदकामामुळे इमारतीमध्ये जाणवत असलेल्या कंपनाने शिक्षकेतर कर्माचाऱ्यांसह विद्यार्थी देखील भयभीत झाले आहेत.  गेल्या महिन्यात याच मार्गावरील ११९ वर्षे जुन्या जे. एन. पेटीट संस्थेच्या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला होता. यावर संस्थेतर्फे खोदकामाच्या स्थगितीकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर उच्च न्यायालयाने १५ सप्टेंबर रोजी डी.एन.रस्त्यावरील खोदकामाला दोन आठवडय़ांसाठी स्थगिती दिली होती. मात्र त्यानंतर मेट्रो प्रशासनाने सिद्धार्थ महाविद्यालयासमोरील काम सुरूच ठेवल्याने इमारतीच्या अंतर्गत भागांची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे.

महाविद्यालयाच्या इमारतीला द्वितीय श्रेणीचा वारसा दर्जा मिळाला आहे. सध्या महाविद्यालयात वाणिज्य आणि अर्थशास्त्र व विधि विभाग धरून सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खोदकामाला सुरुवात झाल्यापासून इमारतीच्या तळघराला प्रचंड नुकसान झाले असून दुसऱ्या मजल्यावरील २०१ वर्ग खोलीच्या भिंतीना मोठय़ा प्रमाणात तडे गेल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य उमाजी मस्के यांनी दिली. याशिवाय उद्ववाहकासमोरील इमारतीच्या मुख्य खांबांची देखील पडझड झाल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या तळघरात एनएसएस, एनसीसी आणि सांस्कृतिक विभाग असल्याने विद्यार्थ्यांचा सतत वावर त्या ठिकाणी असतो. त्यामुळे दुर्घटना घडल्यास प्रचंड नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात महाविद्यालयाने मेट्रो प्रशासनाकडे तक्रार केली असता, ऑगस्टमध्ये या इमारतीत ‘क्रॅक मीटर’ लावण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांत तडे रुंदावले असून त्याचा अहवाल मेट्रो प्रशासन देत नसल्याचा दावा मस्के यांनी केला.  दरम्यान, खोदकामामुळे सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इमारतीला तडे गेल्याचा आरोप मेट्रो प्रशासनाने फेटाळला. महाविद्यालयाकडून कोणतीही लेखी तक्रार आली नसल्याचेही मेट्रो-३च्या प्रशासनाने स्पष्ट केले. ‘कामामुळे होत असलेले कंपन खूप कमी आहे बांधकाम सुरक्षिततेच्या सर्व आवश्यक प्रक्रियांचे पालन केले जात असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.