चारकोप-वांद्रे-मानखुर्द या दुसऱ्या मेट्रो रेल्वेचे घोंगडे पर्यावरण परवानगीच्या मुद्दय़ावर भिजत पडलेले असल्याने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने दक्षिण मुंबईतील आर्थिक केंद्र असलेल्या कुलाब्यापासून अंधेरीतील व्यावसायिक केंद्र असलेल्या ‘सीप्झ’पर्यंत प्रस्तावित असलेल्या मुंबईतील तिसरा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती दिली आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करत एक पाऊल पुढे टाकले आहे.
कुलाबा ते सीप्झ या ३३ किलोमीटरच्या मार्गावर धावणारी तिसरी मेट्रो रेल्वे ही भुयारी असणार आहे. ही तिसरी भुयारी मेट्रो रेल्वे कुलाबा, वांद्रा-कुर्ला संकुल, अंधेरी औद्योगिक वसाहत आणि सीप्झ या व्यावसायिक केंद्रांना एकमेकांशी जोडेल आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळां या ठिकाणांशी जोडेल. या मेट्रो रेल्वेला आठ डबे असतील आणि दर तीन मिनिटांना एक गाडी सुटेल असे नियोजन आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी वित्तपुरवठा करण्याबाबत ‘जापनिज इंटरनॅशनक कोऑपरेशन एजन्सी’ अर्थात ‘जायका’ने सुमारे १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याबाबत सहमती दर्शवली आहे.
प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवणे, निविदांची छाननी व मूल्यमापन, प्रकल्पाचे आरेखन, विविध परवानग्या आदी गोष्टींत सल्लागार कंपनीने सहकार्य करणे अपेक्षित आहे. २०१४ च्या आरंभापासून सल्लागार कंपनीचे काम सुरू होईल.