मुंबई : मुंबई आणि परिसरात मेट्रोचे ३३७ किमी जाळे विणण्याचे उद्दिष्ट असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये कर्मचारी भरती करण्यात येत आहे. नव्या मेट्रो मार्गासाठी बहुतांश तांत्रिक आणि कायम स्वरूपी नेमणुकीच्या १०५३ पदांची ही भरती एमएमआरडीएमध्ये होत आहे. त्याचबरोबर तिकीट विक्री कक्ष आणि ग्राहक सेवा यासाठी बाह्य़ स्रोतांचा आधार घेतला जाणार असून त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या तीन  मार्गाचे उद्घाटन केले. त्याचवेळी २०२१-२२ पर्यंत मेट्रोचे १२० किमीचे काम पूर्ण होईल असे मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. सध्या दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) ‘मेट्रो ७’ आणि दहिसर ते डी.एन. नगर ‘मेट्रो २ ए’ या मार्गिकांचे काम प्रगतिपथावर असून मेट्रो ७ मार्गावरील बाणडोंगरी स्थानकाचे उद्घाटन मोदींनी केले होते. ‘मेट्रो २ ए’ आणि ‘मेट्रो ७’ या दोन्ही मार्गासाठी तिकीट विक्री कक्ष आणि ग्राहक सेवा ही कामे बाह्य़ स्रोतांमार्फत केली जाणार आहेत. त्यासाठी दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली आहे.

कायमस्वरूपी भरती करण्यात येणाऱ्या पदांमध्ये मराठा आणि आर्थिकदृष्टय़ा मागास वर्गाला आरक्षण ठेवण्यात आले आहे. एकूण १२० स्थानक नियंत्रक, १९ स्थानक व्यवस्थापक, १३६ विभाग अभियंते, ३० कनिष्ठ अभियंते आणि मेट्रोच्या चलनवलनासाठी आवश्यक तांत्रिक पदे यामध्ये आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे असणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती एमएमआरडीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.