News Flash

मेट्रो रेल्वेगाडी २७ जानेवारीला मुंबईत

मेट्रो रेल्वेगाडीच्या प्रारूपाचे सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते.

 

मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ मार्गिका जूनमध्ये कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट

मुंबई : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन मार्गिकांवर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेपैकी पहिली गाडी २७ किंवा २८ जानेवारीला मुंबईत दाखल होईल. त्यानंतर २९ जानेवारीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तिचे अनावरण केले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून मुंबई आणि परिसरात २०२६ पर्यंत ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. त्यापैकी मेट्रो २ ए (डीएन नगर ते दहिसर) आणि मेट्रो ७ (अंधेरी पू. ते दहिसर पू.) या एकूण ३५ किमीच्या दोन मार्गिका यावर्षी कार्यरत करण्याचे उद्दिष्ट आहे.

मेट्रो गाड्यांची बांधणी बंगळूरु स्थित भारत अर्थ मूव्हर्स लि. (बीईएमएल) येथे सुरू आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘बीईएमएल’च्या कारखान्यात पहिल्या मेट्रो रेल्वेगाडीचे शुक्रवारी अनावरण केले. पुढील आठवड्यात ही गाडी बंगळूरु येथून निघून २७ किंवा २८ जानेवारीपर्यंत चारकोप येथील डेपोमध्ये दाखल होईल.

मेट्रो रेल्वेगाडी दाखल झाल्यानंतर २९ तारखेला तिचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याचे ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मार्चमध्ये चाचणी घेण्यात येईल, तर जूनमध्ये दोन्ही मार्गिका कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्यात दोन रेल्वेगाड्या येतील. दोन्ही मार्गिकांवर मिळून सुरुवातीस दहा गाड्या धावतील.

मेट्रो रेल्वेगाडीच्या प्रारूपाचे सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. त्यानंतर जुलै २०२० मध्ये पहिली गाडी दाखल होणे आणि दोन्ही  मार्गिका डिसेंबर २०२० मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र करोना आणि टाळेबंदीमुळे त्यास सहा महिन्यांचा विलंब झाला आहे.

दरम्यान सप्टेंबर २०२० मध्ये ‘एमएमआरडीए’ने जाहीर केलेल्या सुधारित नियोजनानुसार पहिली गाडी डिसेंबरअखेरीस येऊन १४ जानेवारीस चाचणी घेण्याचे ठरले होते. मात्र गाडीच्या सुट्या भागांच्या आयातीस विलंब झाल्याने हे आगमनदेखील एक महिन्याने लांबले.

३,८१६ कोटींचा करार : ‘बीईएमएल’बरोबर ५०४ मेट्रो डब्यांसाठी तीन हजार ८१६ कोटी रुपयांचा करार १९ डिसेंबर २०१८ ला करण्यात आला. सहा डब्यांची एक मेट्रो रेल्वेगाडी याप्रमाणे ८४ गाड्यांची बांधणी सध्या सुरू आहे. तसेच मेट्रो ७ मार्गिकेच्या विस्तारित मार्गासाठी (१३.५ किमी) आणखी १२ मेट्रो रेल्वेगाड्यांची वाढ त्यामध्ये करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 1:48 am

Web Title: metro railway 27 january in mumbai akp 94
Next Stories
1 आज आपण क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत – मुख्यमंत्री
2 सोमवारपासून दररोज आठ हजार जणांना डोस
3 पनवेल-कर्जत थेट लोकल चार वर्षांनंतरच
Just Now!
X