येत्या काही वर्षांत मुंबई आणि परिसरात सुरू होणाऱ्या मेट्रोच्या १०५३ विविध पदांसाठी एक लाख पाच हजार ३१३ अर्ज आले असून त्यापैकी ८७ हजार १३५ अर्ज वैध ठरले आहेत. वैध अर्जदारांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे पुढील काही महिन्यात नियुक्ती केली जाणार आहे. यातील काही पदे ही रेल्वे आणि मेट्रो रेल्वेतून प्रतिनियुक्तीवरदेखील भरण्यात येणार आहेत.

पुढील काही वर्षांत मुंबई आणि परिसरात मेट्रो तब्बल ३३७ किमीचे जाळे तयार होणार आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात कर्मचारी गरजेचे आहेत. मेट्रोच्या संचालनासठी ‘महामुंबई मेट्रो संचालन महामंडळा’ची निर्मिती या वर्षी जूनमध्ये करण्यात आली होती. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांची नियुक्ती ऑगस्टमध्ये करण्यात आली.

महामंडळातर्फे सप्टेंबरमध्ये १०५३ कर्मचारी भरती जाहीर करण्यात आली. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला असून लाखभर अर्ज महामंडळाला प्राप्त झाले. यातील जवळपास सर्वच पदे ही तांत्रिक स्वरूपातील आहेत. एकूण १२० स्थानक नियंत्रक, १९ स्थानक व्यवस्थापक, १३६ विभाग अभियंते, ३० कनिष्ठ अभियंते आणि मेट्रोच्या चलनवलनासाठी इतर तांत्रिक पदांचा समावेश आहे. पुढील वर्षअखेर सुरू होणाऱ्या ‘मेट्रो २ ए’ आणि ‘मेट्रो ७’ या दोन्ही मार्गासाठी तिकीट विक्री कक्ष आणि ग्राहक सेवा ही कामे बाह्य़ स्र्रोतांमार्फत केली जाणार आहेत. त्यासाठी दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली आहे. ही सर्व पदे कायमस्वरूपी असून त्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. या मोठय़ा भरतीमध्ये मराठा आणि आर्थिकदृष्टय़ा मागास वर्गालादेखील आरक्षण ठेवण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो तीन नवीन मार्गाचे उद्घाटन केले. त्या वेळी २०२१-२२ पर्यंत मेट्रोचे १२० किमीचे काम पूर्ण होईल असे देखील सांगण्यात आले.