राज्यातील टाळेबंदी आणखी शिथिल करताना सरकारने मेट्रो रेल्वे, ग्रंथालये सुरू करण्यास बुधवारी परवानगी दिली. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेली मेट्रो रेल्वे सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. त्याआधी रविवारपासून मोनोरेल्वेही धावणार आहे.

गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील करोनाबाधितांची कमी झालेली संख्या आणि रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण यांचा विचार करून सरकारने टाळेबंदी आणखी शिथिल केली. मुंबईतील बेस्ट बस सेवेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी वर्सोवा- घाटकोपर मेट्रो सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्थांवरील निर्बंध ३१ ऑक्टोबपर्यंत कायम राहतील. मात्र, शाळांना ५० टक्के शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण आणि अन्य कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून नियमावली जाहीर केली जाणार आहे. कौशल्यविकास संस्था, लघुउद्योग प्रशिक्षण संस्था आदींना प्रशिक्षण सुरू करण्यास, व्यापारी प्रदर्शनास परवानगी देण्यात आली आहे.

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण ऑनलाइनच सुरू राहणार असले तरी संशोधनासाठी प्रयोगशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयांना करोनासंबंधी नियमांचे पालन करून गुरुवारपासून कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील आठवडी बाजार, जनावरांचे बाजार सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी सर्व दुकानांची वेळ वाढवून सकाळी ९ ते रात्री नऊपर्यंत करण्यात आली आहे.  धार्मिक स्थळे खुली करण्याची राज्यपालांची विनंती मात्र सरकारने अद्याप मान्य केलेली नाही. राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम, सोहळ्यांवरील बंदी कायम राहणार आहे.

मेट्रोची तयारी अशी..

* घाटकोपर – वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या सुरक्षा तपासण्या आणि चाचण्यांची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ८.३० पासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल.

* मेट्रो १ च्या व्यवस्थापनाने दोन महिन्यांपूर्वीच उपाययोजना आखण्यास सुरूवात केली होती. अंतरनियम पाळणे, प्लास्टिक टोकनचा वापर कमी करण्यावर भर देण्यात येणार असून, दोन प्रवाशांमध्ये अंतर पाळण्यासाठी आसनव्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे घाटकोपर ते वर्सोवा या टप्प्यात एका वेळी एका मेट्रो गाडीतून केवळ ३०० जण प्रवास करू शकतील. करोनापूर्व काळात याच मेट्रोतून सुमारे १,३५० जण प्रवास करत होते.

* प्रवासासाठी प्लास्टिक टोकन वापरण्याऐवजी मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट काढण्यास प्रोत्साहन दिले जाईल. रिचार्ज कार्डचा वापरही वाढवला जाईल. हे पर्याय वापरता न येणाऱ्यांना छापील तिकीट मिळेल.

* टाळेबंदीपूर्वी रोज सुमारे साडेचार लाख प्रवासी मेट्रो सुविधेचा लाभ घेत होते. गर्दीच्या वेळेस तीन मिनिटांत एक गाडी, तर एरवी पाच मिनिटांत एक गाडी याप्रमाणे दिवसाला ४०० हून अधिक फेऱ्या होत होत्या. सोमवारपासून किती मेट्रो फेऱ्या चालविण्यात येतील, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे मेट्रो १ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.