गाळयुक्त पाणी थेट पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडल्यास कारवाईचा पालिकेचा इशारा

मुंबई : मुंबईत रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे प्रथमच दक्षिण मुंबईमधील कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक परिसर जलमय झाल्यामुळे पालिका अधिकारी बुचकळ्यात पडले. मात्रे ‘मेट्रो-३’च्या स्थानकांची कामे सुरू असलेल्या ठिकाणाहून चिखल आणि मातीयुक्त पाणी पालिकेच्या मलनिस्सारण आणि पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडल्यामुळे पाण्याच्या निचऱ्यात अडथळा निर्माण होऊन परिसर जलमय झाल्याचे निदर्शनास आहे. तसेच मेट्रोने पालिकेच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावून आवश्यकतेपेक्षा कमी पावसाच्या पाण्याचा उपसा करणारे पंप बसविल्याचेही पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असून या प्रकरणाची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे.

मुंबईमध्ये शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून रविवारी सकाळी पावसाने रुद्रावतार धारण केला. यापूर्वी कधीही कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक येथे पावसाचे पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. मात्र रविवारी या परिसरात पाणी साचल्याचे निदर्शनास आले आणि पालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ या परिसरात धाव घेऊन पाहणी केली. ‘मेट्रो-३’ मार्गावरील कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक स्थानकांची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यासाठी खड्डो खोदण्यात आले असून खड्डय़ातील चिखल-माती रस्त्यालगत काढून ठेवण्यात आली आहे.

पावसाच्या पाण्यामुळे चिखल-माती पसरू लागली. तसेच खोदलेल्या खड्डय़ातील पाणी पंपाच्या साह्य़ाने थेट पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडण्यात येत होते. पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये चिखल-माती साचून पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण झाला. परिणामी, मोट्रे रेल्वे स्थानकांची कामे सुरू असलेल्या परिसरात पाणी साचले.

मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचू नये म्हणून पाण्याचा उपसा करणारे पंप बसविण्यात यावे, अशी सूचना पालिकेकडून मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाला करण्यात आली होती. तसेच पाण्यातून गाळ विभक्त करणारी टाकी कार्यस्थळी बसविण्याची सूचनाही पालिकेकडून करण्यात आली होती. कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक येथे सध्या मेट्रो रेल्वे स्थानकाची कामे सुरू आहेत. त्यामुळे कफ परेड येथे १६, विधान भवन आणि चर्चगेट येथे प्रत्येकी आठ, तर हुतात्मा चौकात १० पाणी उपसा करणारे पंप बसविण्याची सूचना पालिकेने मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाला केली होती. मात्र प्रत्यक्षात कफ परेड येथे चार, विधान भवन येथे चार, चर्चगेट येथे सात, तर हुतात्मा चौक येथे सहा पाणी उपसा करणारे पंप बसविण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. तसेच पाण्यातून गाळ विभक्त करणारी टाकी या ठिकाणी उपलब्धच नसल्याचेही पालिका अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

गाळ विभक्त करणाऱ्या टाकीमध्ये गाळयुक्त पाणी साचविले जाते आणि गाळ तळाला बसल्यानंतर टाकीतील पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडण्यात येते. मात्र गाळ विभक्त न करताच चिखल-मातीयुक्त पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडल्यामुळे गाळ साचून पाण्याचा मार्ग अडला गेला. परिणामी या चार ठिकाणच्या मेट्रो स्थानकाच्या आसपासच्या परिसरातील रस्ते जलमय झाले. सूचनेपेक्षा कमी पंप बसविल्याने साचलेल्या पाण्याचा झटपट निचरा होऊ शकला नाही. या प्रकाराकीच पालिकेने गंभीर दखल घेत मेट्रो स्थानकांचे काम करणाऱ्या एल अ‍ॅण्ड टी – एसटीईसी जेव्ही या कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकांना पत्र पाठविले आहे.

मेट्रो स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी किती पंप बसविण्यात आले, पाण्याचा निचरा करण्याबाबत तयार केलेला आराखडा, गाळ विभक्त करणाऱ्या किती क्षमतेच्या टाक्या बसविण्यात आल्या, किती आकाराच्या पाइपमधून पाणी सोडण्यात येते याची माहिती सादर करण्याची सूचना पालिकेने या पत्रात केली आहे. याबाबतची सर्व तपशीलवार माहिती सादर केल्यानंतर पाण्याचा निचरा करण्याबाबतची परवानगी देण्यात येईल. तसेच चिखल-मातीयुक्त पाणी थेट पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडल्यामुळे त्या तुंबतात. यापुढे तसे केल्या कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक या परिसरात यापूर्वी कधीही पाणी साचले नाही. मेट्रो अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त ‘ए’ विभाग कार्यालय