बस थांब्यांवरच ‘बस हुआ..’च्या जाहिराती

उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ न राखता आल्याने तोटय़ाच्या गाळात रुतत चाललेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाला आधुनिक मुंबईच्या वाहतुकीचा चेहरा बनू पाहणाऱ्या मेट्रोकडून आता खुले आव्हान मिळू लागले आहे. लाखो मुंबईकरांचा पूर्व ते पश्चिम उपनगरांपर्यंतचा प्रवास सुखाचा करणाऱ्या मुंबई मेट्रोवन प्रा. लि. या कंपनीने ‘बस हुआ..’ असा संदेश देणाऱ्या जाहिराती करत बेस्टची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, बेस्ट उपक्रमाच्या बसथांब्यांवर मेट्रोच्या जाहिराती झळकत  आहेत.

मुंबई मेट्रोवन प्रा. लि. या कंपनीने नुकतीच दोन वष्रे पूर्ण केली आहेत. दोन वर्षांत मेट्रोच्या प्रवाशांची संख्या दर दिवशी तीन लाखांवर पोहोचली आहे. या दोन वर्षांत मेट्रोने १८ कोटी प्रवाशांनी प्रवास केला असून मेट्रोची प्रवासी संख्या आठ ते दहा टक्क्यांनी वाढली आहे. पुढील वर्षांतही प्रवासी संख्या वाढवण्याच्या दृष्टीने ‘मेट्रोवन’ने जाहिरात कॅम्पेन सुरू केली आहे. मेट्रो मार्गाच्या खाली असलेल्या खांबांवर मोठमोठय़ा भित्तिपत्रकांवर सध्या लोकांना ‘बस हुआ..’ हे दोन मोठे शब्द दिसतात. त्यांच्याखाली कधी ‘इंतजार करना’ किंवा कधी ‘गरमी में सफर करना’ अशा लक्ष वेधून घेणाऱ्या ओळी आहेत. या जाहिरातींतील सर्व मजकूर देवनागरी लिपीत आहे. पण पहिला ‘बस’ हा शब्द इंग्रजीत लिहिला असून त्याचे स्पेिलगही ‘बीएएस’ असे न करता ‘बीयूएस’ असे करण्यात आले आहे.

या इंग्रजी शब्दाचा उल्लेख थेट बस गाडय़ांकडे अंगुलीनिर्देश करतो. विशेष म्हणजे बेस्ट उपक्रमाच्या काही बस थांब्यांवरील जागा कंत्राटदारांनी जाहिरातींसाठी याआधी मुंबई मेट्रोवन प्रा. लि. या कंपनीला भाडेतत्त्वावर दिली होती. आता मेट्रोने ‘बस हुआ’ म्हणत त्याची चांगलीच परतफेड केली आहे. या जाहिरात कॅम्पेनबाबत मुंबई मेट्रोवन प्रा. लि.च्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.