29 November 2020

News Flash

मेट्रोची धाव आता बदलापूपर्यंत

‘एमएमआरडीए’च्या अर्थसंकल्पात १६ हजार कोटींचे प्रकल्प

(संग्रहित छायाचित्र)

‘एमएमआरडीए’च्या अर्थसंकल्पात १६ हजार कोटींचे प्रकल्प

मुंबई : मेट्रोचे जाळे अधिक विणण्याच्या योजनेनुसार बदलापूर मेट्रो विस्तारित करण्यात येणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणाऱ्या मेट्रो मार्गाचा विस्तृत प्रकल्प अहवाल(डीपीआर) लवकरात लवकर तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास(एमएमआरडीए) दिले.  प्राधिकरणाच्या १६ हजार ९०९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पासही मान्यता देण्यात आली.

यंदाच्या अर्थसंकल्पात मेट्रोसह रस्ते, पाणी यांसारख्या पायभूत सुविधांवर अधिक भर देण्यात आला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी २१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

‘एमएमआरडीए’चा २०१९-२०चा १६ हजार ९०९ कोटींचा अर्थसंकल्प प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए.राजीव यांनी सादर केला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. यावेळी प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर आढावा मेट्रोचा बदलापूपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. कांजूरमार्ग ते बदलापूर या ४४.७ किमीच्या उन्नत मार्गास मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प खासगीकरणातून राबविण्यात येईल. सर्व खर्च ठेकेदाराने करणे अपेक्षित असून, तो प्रवासी भाडय़ातून तो वसूल करणेही अपेक्षित आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महानगर प्रदेशातील सर्वच शहरातील प्रकल्पांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देताना शहरी भागातील मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या कामे सुरू असलेल्या तसेच नजिकच्या काळात कामे सुरू करण्यात येणार असलेल्या विविध मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तब्बल सात हजार ४८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

केवळ  मुंबईच नव्हे तर एकूण महानगर प्रदेशाचा सर्वागिण विकास करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात मेट्रो, रस्ते विकास, पाणी पुरवठा अशा विविधांगी प्रकल्पांवर भर देण्याचा प्रयत्न प्राधिकरणाने केल्याचे आर.ए. राजीव यांनी सांगितले.

स्मारकांसाठी निधी

मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून पायाभूत सुविधांसाठी निधी पुरविण्यात यावा, अशी अपेक्षा असते. पण कापूस खरेदी योजनेसाठी प्राधिकरणाच्या निधीचा वापर झाला होता. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी प्राधिकरणाकडून निधी घेतला जाणार आहे. प्राधिकरणाच्या पैशांचा अन्य कामांसाठी वापर करू नये, अशी शिफारस भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) केली होती. तरीही प्राधिकरणाच्या निधीचा वापर केला जातो.

तरतूद अशी..

’ मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात सात हजार ४८६ कोटी

’ आरेतील मेट्रो भवनासाठी १०० कोटी

’ शिवडी-न्हावाशेवा पारबंदर प्रकल्पासाठी ३ हजार कोटी

’ विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गासाठी २२५० कोटी

’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी २१० कोटी

’  विस्तारित मुंबई पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी ८०० कोटी

’ मुंबई नागरी परिवहन प्रकल्पासाठी ५०० कोटी

’ वसई-विरार, मीरा-भाईंदर पाणीपुरवठय़ासाठी ७०४ कोटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 3:25 am

Web Title: metro train project extended from kanjurmarg to badlapur
Next Stories
1 ‘लोककला संबंधित वस्तूंचे संग्रहालय उभारणार’
2 वकील सुधा भारद्वाज यांच्या जामिनाचा ११ मार्चला निर्णय
3 कर्करोगाच्या ४२ औषधांच्या किमतींवर नियंत्रण
Just Now!
X